नागपूर : शहरात वर्षभरात ९ तर गेल्या तीन वर्षात १४ शाळा मराठी शाळा बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षात सहाही मतदार संघात इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. महापालिका आणि एका खाजगी संस्थेने केलेल्या सर्वक्षणात ही बाब समोर आली आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये गेल्या दोन वर्षात मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. जवळपास ७० टक्के विद्यार्थी हिंदी भाषिक तर केवळ ३० टक्के विद्यार्थी मराठी भाषिक आहे. राज्याचा शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात, शैक्षणिक संस्थांमध्ये मराठी भाषेत सर्व कारभार चालावा असा आदेश आहे. मात्र, त्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. चार वर्षापूर्वी शहरात महापालिकेच्या १९४ शाळा असल्याची महापालिकेत नोंद असली तरी सध्या प्रत्यक्षात मात्र १३१ शाळा सुरू आहेत. त्यातील सर्वात जास्त शाळा हिंदी व उर्दू माध्यमाच्या असून मराठी माध्यमांच्या शाळा कमी झाल्या आहेत.
गेल्या दोन वर्षात त्या शाळांमधील ४० टक्के विद्यार्थी संख्या कमी झासे. परिणामी, शाळांची संख्याही कमी झाली असल्याचे समोर आले आहे. उत्तर आणि पूर्व नागपुरातील महापालिकेच्या शाळांची स्थिती बघितली तर त्या भागात ६५ शाळा असताना या शाळांमध्ये ७० टक्के विद्याार्थी हे उर्दू आणि हिंदी भाषिक आहेत, तर ३० टक्के विद्यार्थी केवळ मराठी भाषिक आहे. या ३० टक्क्यांपैकी २५ टक्के विद्यार्थी झोपडपट्टीत राहणारे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंग्रजी माध्यमांच्या सहा शाळा सुरू करण्यात आल्या असून मराठी शाळा बंद होऊ नये यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मात्र कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाही. परिणामी, गेल्या वर्षभरात ९ शाळा बंद झाल्या आहेत. महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकाकडे असताना शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा: रोमहर्षक हवाई कसरतींनी नागपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
शिक्षण विभागाकडे माहितीच नाही
महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी महिनोंमहिने शाळांचा दौरा करीत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा कसा आहे, याची माहिती महापालिकेकडे नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. शिक्षण विभागाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे गेल्या दोन वर्षात मुलांची पटसंख्या किती कमी झाली याचीही माहिती नसल्याचे समोर आले.