लोकसत्ता टीम
नागपूर : नऊ महिन्यांची ‘बेला’ (स्नीफर डॉग) ही आता महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाचा एक भाग झाली आहे. सहा महिन्याच्या प्रशिक्षणानंतर बेल्जियन मेलिनोइस जातीची ‘बेला’ आणि तीचे दोन काळजीवाहू या व्याघ्रप्रकल्पाच्या जलद बचाव दलात सहभागी झाले आहेत. पंजाबमधील पंजकुला येथील इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या मुलभूत प्रशिक्षण केंद्रात १२ स्निफर श्वानांना प्रशिक्षण देण्यात आले. बेला देखील त्याचाच एक भाग होती. उर्वरित इतर स्निफर श्वान इतर व्याघ्रप्रकल्पात सहभागी झाली आहेत. ‘बेला’ला पेंच व्याघ्र प्रकल्पामधील एक आधीचा कुत्रा ‘विली’ (डेजी) ची सोबत मिळाली आहे, जो जर्मन शेफर्ड आहे.
‘विली’ने २०१९ ते २०२० दरम्यान २३ बटालियन, श्वान प्रशिक्षण केंद्र, भोपाळ येथे प्रशिक्षण घेतले होते. पाच वर्षांची ‘विली’ उमरेड-पवनी-कऱ्हांडला (वन्यजीव) अभयारण्य आणि पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रामध्ये अनेक शिकार आणि वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये शरीराचे अवयव आणि इतर पुरावे शोधण्यात महत्त्वपूर्ण ठरली आहे. ती २०२१ मध्ये ‘सुपर स्निफर्स ऑन द प्रोल’ म्हणून ट्रॅफिक इंडियाद्वारे निवडण्यात आलेल्या उमेदवारांपैकी एक होती. सध्या, ‘विली’ पवनी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रातील जलद बचाव दलाच्या केंद्रात आहे. तर ‘बेला’ नागलवाडी एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रातील अंबाझरी येथील जलद बचाव दलाच्या केंद्रात आहे.
आणखी वाचा-‘एसीबी’चे महासंचालक पद रिक्त, प्रभारींच्या भरोश्यावर कारभार!
या प्रकारे दोन्ही बफर वनपरिक्षेत्रामध्ये एक स्निफर श्वान कक्ष आहे. ते वन विभागाच्या गस्त घालणाऱ्या पथकाशी सामील होत आहेत आणि ‘एंटी-स्नेअर’ आणि ‘एंटी-इलेक्ट्रोक्युशन’ मोहिमेदरम्यान सहभाग घेत आहेत. पंचकुला येथील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स शिबिरात १२ वन्यजीव ‘स्निफर श्वान’ पथकांनी त्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले. हे श्वान आता त्यांना हाताळणारे २४ जण वन्यजीवांची शिकार करणारे शिकारी तसेच अवैध व्यापारापासून भारतातील वन्यजीवांचे संरक्षण करतील. हे श्वान शिकाऱ्यांचा जंगलातून मागोवा घेण्यापासून तर शिकाऱ्यांनी लपवलेले सापळे आणि वन्यजीव प्रतिबंधक गोष्टी देखील शोधणार आहे.
आणखी वाचा-नागपूर : प्रीपेड मीटरविरोधात जाहिर सभांचा धडाका! ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी…
ही नवीन वन्यजीव स्निफर श्वान पथके आता उत्तराखंड वनविभागात चार, ओडिशा वनविभागात दोन, छत्तीसगड वनविभागात दोन, झारखंड वनविभागात एक, मध्यप्रदेश वनविभागात एक, महाराष्ट्रात एक आणि पश्चिम बंगाल वनविभागात एक पथक सहभागी होणार आहे. ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्प, झारखंडमधील पलामू व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प, मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्प, पश्चिम बंगालमधील बक्सा व्याघ्र प्रकल्प, छत्तीसगडमधील गोमरधा वन्यजीव अभयारण्य, आणि कलागड विभाग, कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प आणि उत्तराखंडमधील राजाजी व्याघ्र प्रकल्पात ते पाठवले जाणार आहेत.