बुलढाणा : खामगाव तालुक्यातील हजारो नागरिकांनी रविवारी (ता. ७) रात्री निसर्गाचा झंझावात व पावसाचे तांडव अनुभवले. तालुक्यातील आवार महसूल मंडळात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. मंडळात काही तासातच आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल २१९.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर मंडळातही कोसळधार पाऊस बरसला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नऊ व्यक्तींची नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी सुटका केल्याने मोठा संभाव्य अनर्थ टळला आहे. आज, सोमवारी दुपारी पथकांनी हे यशस्वी ‘रेस्क्यू ऑपरेशन ‘ पार पाडले.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रविवारच्या रात्री पावसाने कहर केला. आवार महसूल मंडळात विक्रमी आणि प्रलयंकारी इतका २१९ .२५ मिलिमीटर पाऊस झाला. ढग फुटल्यासारखा हा पाऊस कोसळत राहिला. याशिवाय हिवरखेड महसूल मंडळात १२६.५० मिलिमीटर, जनूना मंडळात ११९.५० मिलिमीटर, काळेगाव मंडळात १०४.५० मिमी, पळशी मंडळात ९३.२५ मिमी, खामगाव महसूल मंडळात ६५.७५ मिलिमीटर, लाखनवाडा मंडळात ६८.७५मिलिमीटर असे अतिवृष्टी ने थैमान घातले. उर्वरित। दोन मंडळात अतिवृष्टी ( ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस) झाला नसला तरी धोधो पाऊस पडला आहे. पारखेड मंडळात ६२ मिमी तर आडगाव मंडळात ६०.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आकारणे विस्तिर्ण आणि अवर्षण प्रवण खामगाव तालुक्यात पाणीच पाणी चोहीकडे असे भयावह चित्र आहे. हजारो हेक्टरवरील शेती पाण्यात बुडाली असून शेताना तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
हेही वाचा >>>नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात मोठी वाढ, यंदापासून कुठल्या अभ्यासक्रमासाठी किती शुल्क द्यावे लागणार बघा
खामगाव तालुक्यात पावसाचा जोर इतका जास्त होता की, जणू जलप्रलय आला आहे. नद्या, नाल्या दुथडी भरून वाहून गेल्या कित्येकांच्या घरात पाणी शिरलं. कित्येकांचा संसार पाहून गेला. यामध्येच खामगाव तालुक्यातील कोलेरी गावात अनेक जण पुराच्या वेड्यात अडकले होते. चहूबाजूंनी पाणी होतं, जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने, खामगाव येथील तहसिल कार्यालयाचे पथक आणि गावकऱ्यांनी ही कामगिरी केली.
खामगाव आणि शेगाव च्या सीमाना लागून असलेल्या कोलोरी गावात अतिवृष्टी झाली. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी अकोला रोडला लागून असलेल्या शेतात टाळावासारखे पाणी साचले. हे पाणी वाढतच गेल्याने घर आणि सदस्य पुराच्या पाण्याने वेढल्या गेले. गावचे पोलीस पाटील गणेश टिकर यांनी तहसील, पोलीस, आपत्ती विभागाला तातडीने माहिती दिली. घटनास्थळी बुलढाणा, खामगाव येथून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, तहसीलदार घटनास्थळी आले. बोटीच्या साह्याने, रोप वे च्या आधाराने पाण्यात उतरून ९ जणांना वाचविण्यात आले. जगदीश बारेल, सखाराम बारेल, मनीषा भरेल, रूहानी बारेल, ऐश्वर्या, आशिष ,अभिमन्यू सेजव, संदीप डोंगरे, विनोद सरदार अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे देखील पाण्याचे विळख्यात अडकले असताना त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी यश आले.
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. बुलढाणा जिल्हा पथकातील कृष्णा जाधव, तारासिंग पवार, फिरोज कुरेशी, अमोल वाणी, युसूफ पटेल, गुलाबसींग राजपूत सलीम बरडे, संतोष साबळे यांच्यासह खामगाव पथकातील कर्मचार्यांनी ही कामिगीरी बजावली.