चंद्रपूर : ओबीसी, दलित व मुस्लीम समाजासोबतच शेतकरी, शेतमजूरांची गठ्ठा मते महाविकास आघाडीला मिळाल्यानेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा होऊनही काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा विजय सुकर झाला आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा झंझावातही या त्सुनामीत टिकू शकला नाही हेच धानोरकर यांच्या मताधिक्क्याच्या आघाडीवरून दिसून येत आहे. संविधान बदलाचा प्रचारही घरोघरी पोहचल्याने काँग्रेसला फायदा झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर-वणी-आर्णी हा लोकसभा मतदार संघ ओबीसी बहुल आहे. या लोकसभा मतदार संघातून ओबीसी उमेदवाराला रिंगणात उतरविण्याऐवजी भाजपाने आर्य वैश्य या अल्पसंख्यांक समाजातून येणारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. १९८९ व १९९१ या दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने मुनगंटीवार यांची लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा नव्हती.

आणखी वाचा-धानोरकर कुटुंबीयांची परंपरा; केंद्र व राज्याच्या मंत्र्यांना करतात पराभूत

विशेष म्हणजे मुनगंटीवार यांनी ही इच्छा पक्षश्रेष्ठींना बोलून दाखविली. तसेच या लोकसभा मतदार संघातून ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भाजपा नेत्यालाच उमेदवारी द्यावी असेही पक्षश्रेष्ठींना सांगितले. मात्र मुनगंटीवार यांना तुम्हीच या लोकसभा मतदार संघातून लढा असे निर्देश देण्यात आले. निवडणूक लढण्याशिवाय आता कुठलाही पर्याय नाही असे लक्षात येताच मुनगंटीवार यांनी अखेरच्या क्षणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. यालट परिस्थती काँग्रेस पक्षात होती. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी द्यावी अशी स्थानिक तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांची इच्छा होती. मात्र विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथून मुलगी शिवानी वडेट्टीवार यांचे नाव समोर केले.

शेवटी उमेदवारीचा तिढा निर्माण होताच पक्ष श्रेष्ठींनी वडेट्टीवार यांना एक तर तुम्ही लढा अन्यथा धानोरकर यांना उमेदवारी द्या अशी अट टाकली. त्यामुळे शेवटच्या क्षणी धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेसची उमेदवारी शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर झाली नाही, नेमका त्याचा फायदा काँग्रेस उमेदवार आमदार धानोरकर यांना मिळाला. धानोरकर यांना उमेदवारी मिळण्यास विलंब होत असल्याने या लोकसभा मतदार संघात बहुसंख्येने असलेला कुणबी समाज एकवटला गेला. त्यानिमित्ताने समस्त ओबीसी समाजा एकत्र आला, संविधान बदल हा प्रचार तळागाळात पोचहल्याने दलित समाजाची गठ्ठा मते एकत्र आली तथा मुस्लीम समाजही यानिमित्ताने एकवटला गेला. ओबीसी, दलित व मुस्लीम समाजाची गठ्ठा मते काँग्रेसच्या उमेदवार धानोरकर यांना मिळाल्याने त्यांचा विजयी मार्ग सुकर झाला. धानोरकर यांच्यासाठी ‘निर्भय बनो’च्या वतीने जाहीर सभा घेतल्या गेली.

आणखी वाचा-ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘मी निराश, पण आशा सोडली नाही…’

‘निर्भय बनो’च्या सभेला मिळालेला प्रतिसाद बघता तेव्हाच धानोरकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत ‘निर्भय बनो’च्या स्वयंसेवकांनी धानोरकर यांचे नाव घरा घरात पोहचविले. सहाही विधानसभा मतदार संघात धानोरकर यांची एकाही मोठ्या नेत्याची जाहीर सभा झाली नाही. मात्र या मतदार संघात जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने धानोरकर यांचा विजय सहज शक्य झाला. विदर्भात धानोरकर या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. धानोरकर यांचा विजय मुनगंटीवार यांच्यासाठी चिंतनाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मुनगंटीवार यांना त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी दगाफटका दिला. स्थानिक कार्यकर्त्यांनीही निवडणुकीत सक्रीय प्रचार केला नाही तथा मोदी सरकारवर असलेली शेतकरी, शेतमजूर, मुस्लीम, दलित मतदारांची नाराजी प्रत्यक्ष मतदानातून दिसून आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirbhay bano campaign and constitution benefits for congress obc dalit muslim community vote for pratibha dhanorkar rsj 74 mrj
Show comments