चंद्रपूर : शहरात गुरुवार १४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता, न्यू इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर ‘निर्भय बनो’ च्या सभेचे आयोजन केले आहे. चंद्रपुरातील सामाजिक क्षेत्रातील विविध संस्था-संघटनांनी एकत्र येऊन या सभेचे आयोजन केले आहे. या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, भारतीय संविधानाचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. असीम सरोदे, राजकीय विचारवंत, पर्यावरण तज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.
प्रबोधनाच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, पत्रकार निखिल वागळे, निरंजन टकले, कुमार सप्तर्षी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव इत्यादी विचारवंतांनी पुरोगामी महाराष्ट्रात जाणीव जागृती करण्याचे काम हातात घेतले असल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्लेसुद्धा झालेले आहेत. स्वतःचे जीव धोक्यात घालून हे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रभर सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना बळ मिळण्यासाठी चंद्रपुरातील विविध सामाजिक संस्था-संघटनांच्या वतीने येत्या गुरुवारी या सभेचे आयोजन केले आहे.
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
हेही वाचा – “संजय राऊत खोटे बोलताहेत,” प्रकाश आंबेडकर यांचे विधान; म्हणाले, “आधी भांडणे मिटवावीत…”
हेही वाचा – आमदार संजय गायकवाड म्हणतात, “बुलढाणा मतदारसंघ सेनेचाच, तो भाजपला देण्याचा प्रश्नच नाही”
१९१७ ला महात्मा गांधी यांनी चंपारण्यात ब्रिटिशांच्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात ‘निर्भय बनो’ चा नारा दिला होता. देशातील लोकशाही सुस्थितीत ठेवायची असेल तर, कुणालाही न घाबरता देशातील लोकांनीच प्रत्येक स्थितीला समोरे येणे गरजेचे आहे. त्यामुळेच आजही ‘निर्भय बनो’ हा नारा अधिकच महत्त्वपूर्ण बनला आहे. चंद्रपूरकरांनी ‘निर्भय बनून’ या सभेला जास्तीत जास्त संख्येने यावे, व ही सभा यशस्वी करावी असे आवाहन आयोजक “आम्ही निर्भय चंद्रपूरकर”च्या वतीने करण्यात आले आहे.