वर्धा : निवडणूक लागली की आदर्श आचारसंहिता लागू होत असते. त्याचे कसोशीने पालन करावे, असे निर्देश निवडणूक आयोग देत असते. जिल्हा निवडणूक कार्यालय मग तशी कठोर अंमलबजावणी करण्यास दक्ष राहते. आचारसंहितेनुसार प्रचार समाप्त झाल्यावर कुठल्याही पक्षाच्या स्टार प्रचारकास ३६ तासांच्या अवधीत किंवा मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपले विधानसभा क्षेत्र सोडून अन्य विधानसभा क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई असते. प्रवेश करण्यास किंवा हस्तक्षेप करण्यास मनाई आहे. असा दाखला देत वर्धा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक पथक प्रमुखांनी सावंगी पोलीस ठाण्यास तक्रार दिली. तक्रारीनुसार राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे स्टार प्रचारक नीतेश कराळे यांनी देवळी मतदारसंघातील त्यांचे मूळ मांडवा हे गाव सोडून वर्धा मतदारसंघातील उमरी मेघे येथे दाखल झाले. मतदान केंद्रावर येत वादविवाद केला. त्यामुळे आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले. सबब त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवडणूक पथक प्रमुखांनी तक्रारीत नमूद केले आहे.
त्यानुसार आज सावंगी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, लोकप्रतिनिधित्व अधिनियम अंतर्गत तीन वेगवेगळे गुन्हे कराळे यांच्यावर दाखल केले आहे.
मतदानाच्या दिवशी कराळे गुरुजी हे उमरी येथे आपल्या गाडीने सहकुटुंब पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी तज्ञाच्या भूमिकेतून काही आक्षेप घेतले. ते चुकीचे आहे म्हणत गावचे माजी सरपंच सचिन खोसे यांनी कराळे यांना नाहक नाक कशाला खूपसता असे विचारत चांगलेच चोपले. हस्तक्षेप झाल्याने गुरुजी थोडक्यात वाचले, असे गावकरी बोलून गेले. मात्र त्यानंतर दोन्ही गटाकडून वादावादी पण सुरू झाली. भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर व काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे हे पण घटनास्थळी आले. दोन्ही गटात वाद झडले. पोलीस पोहोचले. दोन्ही गटांच्या एकमेकाविरोधात तक्रारी झाल्या.
हेही वाचा – तपासा आपले शरीर, तयार करा आरोग्य कुंडली, काय आहे उपक्रम ते बघा
हेही वाचा – सत्तास्थापनेच्या हालचालीत सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर
कराळे व खोसे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आता हे नव्याने गुन्हे आज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे करायला गेलो काय आणि झाले उलटे पाय, अशी गुरुजींची स्थिती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळत सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ज्या गावात कराळे गुरुजी हस्तक्षेप करण्यास पोहोचले त्या गावात त्यांच्या काँग्रेस उमेदवारास खूप कमी मते पडली तर भाजप उमेदवारास चांगले मताधिक्य मिळाले. गुरुजी हे काय झाले हो, अशी गंमत उडविल्या जात असल्याचे दिसते. स्टार प्रचारक म्हणून सर्वत्र फिरणाऱ्या गुरुजींची बोली अजिबात चालली नाही तर, असे निकाल पाहून म्हटल्या जात आहे.