नागपूर: ‘खदखद’ मास्तर म्हणून संपूर्ण देशात ओळख मिळालेले वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. समाज माध्यमांवर त्यांचे लाखो फालाेअर्स असून यामुळे कराळे यांच्या व्हीडीओंची सर्वत्र चर्चा असते. मंगळवारी कराळे मास्तर यांनी आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून काँग्रेस पक्षात प्रवेश करून देवळी पुलगाव किंवा वर्धा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. काँग्रेस पक्षाकडे तिकीटासाठी बोलणी सुरू असून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पक्के असल्याचेही कराळे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी कराळे यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. यात त्यांनी घेतलेली मते प्रमुख राजकीय पक्षांसाठी लक्षवेधी ठरली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतरच त्यांच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अनेक दिवसांपासून त्यांचा प्रवास हा काँग्रेस पक्षाच्या दिशेने सुरू होता. माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांचे ते निकटवर्ती आहेत. त्यामुळे कराळे मास्तर हे येत्या काळात काँग्रेस पक्षातून विधानसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. स्वत: कराळे यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीला समोर जाण्याची घोषणा करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मागील काही दिवांपासून राज्य सरकारने काढलेल्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णयाविरोधात त्यांचे वर्धा येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे. काही महिन्यांपासून कराळे सर हे आपल्या व्हीडीओच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवीत आहेत. यातून त्यांची राजकीय महत्त्वकांक्षा लक्षात येत होती. त्यानंतर आता त्यांनी निवडणूक लढवणार असे जाहीर केले. तसेच काँग्रेस पक्षात गेलो तरी जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज उठवायला कुणाला घाबरणार नाही असेही सांगितले.