अमरावती : आदिवासी समाजातील डॉ. नितेश कास्देकर या मेळघाटच्या सुपूत्राचा अमेरिकेतील वैज्ञानिक म्हणून यशस्वी प्रवास सध्या चर्चेत आहे. मेळघाटातील चटवाबोड या लहानशा गावातून थेट अमेरिकेत पोहचलेल्या या संशोधक पुत्राचे गावाला कौतूक आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. नितेश यांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागला, पण जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेत त्यांनी संशोधनाच्या क्षेत्रात झेप घेतली. ते सध्या अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठात ‘पोस्टडॉक्टरल रिसर्च असोसिएट’ म्हणून कार्यरत आहेत.

नितेश यांचे चटवाबोड हे चौदाशे लोकवस्तीचे गाव. नितेश यांची आई हिरूबाई आणि वडील मोतीलाल यांच्याकडे तुटपूंजी शेती. सहा मुले आणि दोन मुली अशा मोठ्या कुटुंबात वाढलेल्या नितेश यांचे प्राथमिक शिक्षण चटवाबोड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्यांनी नंतरचे शिक्षण लवादा येथील चुन्नीलाल पटेल अनुदानित आश्रमशाळेतून पूर्ण केले. २०१० मध्ये दहावीच्या परीक्षेत नितेश यांना ८१ टक्के गूण मिळाले होते. बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांनी धारणी गाठले आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. धारणीच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत राहून त्यांनी इयत्ता बारावीत ६० टक्के गुण मिळवले.

नितेश यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले. रसायनशास्त्र या विषयात नितेश यांचा विशेष रुची निर्माण झाली. नंतर पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून ‘ऑरगॅनिक केमेस्ट्री’ या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. रसायनशास्त्राविषयी ओढ एवढ्यावरच थांबली नाही, नंतर त्यांनी पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतून (आयआयएसईआर) पीएच.डी प्राप्त केली. सप्टेंबर २०२४ पासून ते अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठात ‘पोस्टडॉक्टरल रिसर्च असोसिएट’ म्हणून कार्यरत आहेत.

शिक्षकांना आभाराचे पत्र

परदेशात जाऊनही नितेश हे मेळघाटात घट्ट रुजलेल्या मुळांना विसरु शकले नाही. अमेरिकेतील प्रतिष्ठित वि‌द्यापीठात मौल्यवान संशोधनाचे काम करत असतानाही धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आणि  आपल्या शिक्षकांना आभार मानणारे पत्र पाठविले आहे.

मेळघाटातील विद्यार्थी हे गुणवतेच्या बाबतीत सरस आहेत, हे डॉ. नितेश यांच्या उदाहरणावरून दिसून येते. त्यांच्याप्रमाणे परिस्थितीवर प्रत्येकाने मात करून उत्तरोतर प्रगती केली पाहिजे. मेळघाटातील विद्यार्थ्यांनी डॉ. नितेश याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली शैक्षणिक कारकीर्द घडवली पाहिजे, अशी प्रतिक्रिया एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader