अकोला : पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी येथे केले.
अकोला जिल्ह्यात रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, “माझे कोणी काहीही करू शकत नाही. पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या. ते काहीही करू शकत नाहीत. भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील. आमच्या राज्यात आमच्यावर काही करू शकणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही?”.
सर्वत्र अतिक्रमण केले जात आहे. राजरोसपणे हिंदू समाजाच्या कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरातून बळजबरीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, असा आरोप देखील नितेश राणे यांनी केला. हिंदू समाजावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आवाज उचलला पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. दरम्यान, नितेश राणेंच्या विधानावरून आता चौफेर टीका होत आहे.