अमरावती : आगामी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कुणी आमच्या वाटेला निष्कारण जात असेल तर आम्ही त्याला अजिबातही सोडणार नाही, असा आक्रमक इशारा देत विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल, असे मत आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.
स्थानिक मानसरोवर सभागृहात आयोजित समाजमाध्यमांचा प्रभाव या विषयावरील बैठकीत ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय आदी यावेळी उपस्थित होते.
अमरावती लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. कर्नाटकात अराजकता तयार होत आहे. सत्तांतर झाल्यानंतरचा हा बदल लक्षात घेण्यासारखा असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. समाज माध्यमांचा वापर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नऊ वर्षांत केलेल्या कामाचा आलेख हा फार मोठा आहे, असे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. काळजीपूर्वक समाजमाध्यमांचा वापर करून २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.
समाजमाध्यमातून सध्या अपप्रचार होत आहे. अशा अपप्रचाराला आपण आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना सत्याची बाजू सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. नऊ वर्षांत एकही घोटाळा नसल्याने संपूर्ण विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.