शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हटलं होते. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली, तर आम्हीही ऐकणार नाही. शेवटचा इशारा देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात, तर ‘मातोश्री’बाहेर पडू देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले होते.

बावनकुळेंच्या विधानाचा आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार नितीन देशमुख यांनी समाचार घेतला आहे. ते नागपूर येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या ‘वज्रमूठ’ सभेत बोलत होते. ‘मतीमंद प्रदेशाध्यक्षांनी साध्या शिवसैनिकाला नागपुरात येण्यापासून रोखून दाखवावे,’ असं आव्हान नितीन देशमुखांनी बावनकुळेंना दिलं आहे.

नितीन देशमुख म्हणाले, “आठ-दहा दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरेंना ‘मातोश्री’च्या बाहेर पडू देणार नाही, असं म्हटलं होतं. माझं मतीमंद प्रदेशाध्यक्षांना आव्हान आहे, आपण साध्या शिवसैनिकाला नागपुरात येण्यापासून रोखून दाखवावे. तेव्हा म्हणेल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मतीमंद नाहीत म्हणून.”

हेही वाचा : “अजित पवारांची अमित शाहांबरोबर…”, संजय शिरसाटांचा मोठा दावा; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

“हे सरकार ईडीच्या भरवशावर आलं आहे. सरकार कसं आलं, कसं स्थापन झालं, हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती नाही. ईडीमुळे फक्त सरकारच आलं नाहीतर आशिया खंडात सर्वात जास्त गद्दार कोणाला म्हणत असतील, तर ते ४० आमदारांना म्हणतात. आशिया खंडात ईडीमुळे महाराष्ट्राला कलंक लागला आहे,” असं नितीन देशमुखांनी म्हटलं.

हेही वाचा : अजित पवारांनी दिल्लीत अमित शाहांची घेतली भेट? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

“आमचे ४० आमदार सुद्धा म्हणतात नरेंद्र मोदींचा फोटो लावून आपण निवडून आलो आहोत. २०१४ साली शिवसेना स्वबळावर निवडणूक लढली. तेव्हा ६३ आमदार निवडून आले होते. २०१९ साली भाजपा-शिवसेनेची युती होती, आम्ही मोदींचा फोटो लावून निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी आमचे ५६ आमदार निवडून आले. मोदींच्या फोटोमुळे आमची मतं कमी झाली,” असेही नितीन देशमुखांनी सांगितलं.

Story img Loader