नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट मतांसाठी प्रसिद्ध आहेत. गडकरी यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये मी संघवाला असून शुद्ध शाकाहारी आहे असे अनेकदा सांगितले. तर जात, धर्म, पंथावरून त्यांनी आपले परखड मत व्यक्त केलेले आहे. हल्लीच्या तरुणांना ते नेहमी उद्योग करण्याचा सल्ला देतात. असाच एक सल्ला त्यांनी त्यांचा मुलगा निखिल गडकरी यांना दिला.

आपण शाकाहारी आहोत. कधीही मासोळी खात नाही. त्याचा वासही घेत नाही. पण, आपण मासोळीचा व्यवसाय करण्यात काहीही गैर नाही. यातूनच निखिल गडकरी यांनी दीडशे कोटी रुपयांची मासोळी विदेशात निर्यात केली आहे. त्यांचा हा सल्ला सर्वच समाजातील नवउद्योजकांसाठी प्रेरणादायक आहे.

नागपुरातील एका कार्यक्रमात ते या संदर्भात बोलले होते. सध्या त्यांची यासंदर्भातील रील सोशल मीडियावर चांगलीच वायरल झालेली आहे. पुढे गडकरी असे म्हणाले की, मुलाने गोवा येथून ३०० कंटेनर मासोळी घेऊन सर्बिया या देशात पुरवठा केला. यावेळी त्याला चांगला नफाही झाला. गडकरी पुढे म्हणाले, ॲडव्हांटेज विदर्भ हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. त्यातून येथील व्यवसाय बळकट करण्यासह नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध केली जाईल. विदर्भातील तलावात चांगले झिंगे तयार होतात. या झिंग्याला नागपुरात ८०० रुपये प्रति किलो भाव आहे.

दरम्यान सिंगापूरला झिंग्याला ८ हजार रुपये प्रति किलो तर दुबईत ७ हजार रुपये प्रति किलो भाव आहे. त्यामुळे येथील झिंगे तेथे पाठवल्यास मत्स व्यवसायिकांना मोठा लाभ शक्य आहे. त्यामुळे कुठलाही व्यवसाय करणाऱ्याला जात, धर्मपंथ याचे बंधन नसते अस सल्लाच गडकरींनी एक प्रकारे दिला.

देशात १०० टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहने वाढणार आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल, डिझेलसह इंधनासाठीचे २२ लाख कोटी रुपये वाचतील. शेतकऱ्यांच्या पिकापासून इथेनाॅल तयार होणार असल्याने हे २२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडे जायला हवे, असेही गडकरी यांनी सांगितले. मथूरादास मोहता विद्यान महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण झाले असून येथील शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवल्याने ते देश- विदेशात मोठ्या पदांवर काम करत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.