नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाजनसंपर्क अभियान सुरू केले आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून केंद्राने केलेल्या कामांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा यामागचा उद्देश, असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो. मात्र हे अभियान राबवताना गडकरींनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. फक्त आपल्या विचारांच्याच लोकांशी संपर्क नको, तर जे आपल्या विचारांचे नाहीत, विरोधक आहेत, त्यांच्याही घरापर्यंत जा, त्यांची मने जिंका, असे ते म्हणाले.
रविवारी उत्तर नागपुरातील कार्यकर्ता स्नेहमिलन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना उत्तर नागपुरातून या राखीव मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांच्या भाषणावरून स्पष्ट होते. ते म्हणाले, मी कधीही ‘लोकांना भेटणार नाही’ असे म्हणालो नाही तर मते मागण्यासाठी प्रचार फलक लावणार नाही,असे म्हणालो. मी माझ्या कामांवर व लोकसेवेवर मते मागणार, त्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाणार. कोविडमध्ये अनेकांना मदत केली. ती करताना तो आपला किंवा परका असा विचार केला नाही. मी फक्त भाजपचा मंत्री नाही तर देशाचा मंत्री आहे. समाज बदलला तरच देश बदलेल ही माझी भावना आहे. कार्यकर्त्यांनी याच भावनेतून काम करावे.