गोंदियाः १९९५ ला राज्यात मोठे सत्तांतर झाले. काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे सरकार आले. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. याच सरकारमध्ये आणखी दोन महत्वाचे मंत्री झाले. त्यातले एक नागपूरचे नितीन गडकरी व दुसरे आमगावचे महादेवराव शिवणकर. गडकरी सार्वजनिक बांधकाम तर शिवणकर सिंचन व वित्त आणि नियोजन मंत्री होते. पण, युतीच्या शासन काळात पक्षातील आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात नितीन गडकरी आणि महादेवराव शिवणकर यांची काही मुद्दयांवरून बिनसले. त्या मतभेदांची चर्चाही खूप झाली. असे हे दोन्ही चर्चित नेते शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी पुन्हा भेटले.

आमगाव देवरीचे उमेदवार संजय पुराम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गडकरी आले असता त्यांनी महादेवराव शिवणकर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या हयातीतच आपले राजकीय मतभेद दूर सारल्याचेही सूचित केले. या प्रसंगी नितीन गडकरी यांच्या सोबत माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, गोंदिया भाजपचे सुनिल केलनका उपस्थित होते. १९९५ च्या महायुतीशासन काळानंतर राज्यातील राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करण्यात हे दोन्ही नेते प्रयत्नशील असताना भारतीय जनता पक्षात वयानी ज्येष्ठ असलेले महादेवराव शिवणकर यांचे नितीन गडकरी यांच्या सोबत राजकीय मतभेदाची चर्चा वर्तमानपत्रातून दररोज वाचायला मिळायची. आज शिवणकर ८५ वर्षांचे आहेत. पार्किनसन या आजाराने ग्रस्त असून रुग्णशयेवर आहेत. त्यामुळे गडकरी त्यांना आवर्जुन भेटायला गेले.

हेही वाचा – विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध? उच्च न्यायालय म्हणाले…

हेही वाचा – खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका

महादेवराव शिवणकर यांनी २०१४ मध्ये आपला मुलगा विजय शिवणकर यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सानिध्यात पाठवले. राजकीय भविष्याच्या शोधात त्यांचा तत्कालिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करवून घेतला. त्यानंतर खासदार पटेलांनीही महादेवराव शिवणकर यांच्या मैत्रीखातर विजय शिवणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिवपदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केली होती. पण काळांतराने विजय शिवणकर यांनी २०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार परिणय फुके यांच्या पुढाकाराने पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता ते गोंदिया जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते आहेत.