प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : साहित्यिकांनी विचार प्रखरपणे मांडला पाहिजे व हा त्यांचा अधिकार राजकारण्यांनी मान्य केला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत तीन दिवस चाललेल्या संमेलनाच्या समारोपास संमेलनाध्यक्ष माजी न्या. नरेंद्र चपळगावकर व स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, आमदार डॉ. पंकज भोयर, कार्याध्यक्ष प्रदीप दाते, सागर मेघे, उज्ज्वला मेहंदळे यांची उपस्थिती होती. या वेळी गडकरी म्हणाले, की वादाशिवाय कुठलेही कार्य होत नाही. मात्र येथे साहित्य व राजकारण हा वाद झाला नाही, याचा आनंद वाटत आहे. संमेलनास प्रशासनाने मदत केली म्हणून अधिकाऱ्यांचा सत्कार झाला. हीच सहकार्याची भावना राजकारण्यांची होती. साहित्याने समाजाला जोडण्याचे काम केले आहे. केवळ आर्थिक महाशक्ती होणे पुरेसे नाही तर साहित्यातील संस्कारमूल्ये जपणेही आवश्यक आहे. साहित्यातून समाज घडतो. साहित्यात भविष्यातील दिशांची प्रतििबबे उमटतात. पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम तयार करणारे साहित्यिक मूल्यांचीच गुंतवणूक करीत असतात. संस्काराचा संबंध विचारांशी व विचारांचा संबंध साहित्याशी असतो. साहित्य प्रसाराचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. नव्या पिढीस साहित्याची ओढ लागावी म्हणून आपल्याला त्यांच्या तंत्राने चालावे लागेल. पुस्तकांचे महत्त्व आहेच पण नव्या पिढीला त्यात स्वारस्य नसल्याचे कटू सत्य आहे. म्हणून डिजिटल पुस्तके निघाली तर अधिकाधिक वाचकांपर्यंत साहित्य पोहोचू शकेल.
संमेलन वर्धेत आयोजित करण्याच्या घडामोडीत सुरुवातीपासून असल्याचे गडकरी म्हणाले. उदगीरचे संमेलन पाहिले होते. त्यामुळे वर्धेत असे यशस्वी संमेलन होईल का, ही शंका होती. पण हे संमेलन चांगलेच यशस्वी ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी प्रकाशक राजीव बर्वे व ज्येष्ठ लेखक म. रा. जोशी यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इच्छुक संस्थांना आवाहन
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी ९७व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी इच्छुक संस्थांनी १५ एप्रिल २०२३ पर्यंत पत्र पाठवावे, असे आवाहन केले. संमेलन आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अभियंता महेश मोकलकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, कलावंत हरीश इथापे व आशीष पोहाणे, वृक्षप्रेमी मुरलीधर बेलखोडे, साहित्य संस्थेचे रंजना दाते, संजय इंगळे तिगावकर, मिलिंद जोशी, हेमचंद्र वैद्य, डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात आला.
मतभेदाच्या भिंती वितळू द्या : चपळगावकर
संमेलनाध्यक्ष चपळगावकर म्हणाले, की इतर जे बोलत नव्हते, ते मी बोललो. आधीच्या कित्येक संमेलनांपेक्षा माझ्यावर लोकांनी भरभरून प्रेम केले. विदर्भात पूर्वीपासून राजकारण बाजूला ठेवून साहित्यास प्राधान्य देण्याची परंपरा राहिली आहे. साहित्याचा विचार मांडणाऱ्यांनी आदानप्रदान केले पाहिजे. म्हणून मी विद्रोही संमेलनास भेट दिली. संमेलने कमी खर्चामध्ये करता आली पाहिजेत. मतभेदाच्या भिंती वितळू द्या, साहित्याची नवी सरिता नव्या पिढीला पाहू द्या, अशी अपेक्षा चपळगावकर यांनी व्यक्त केली.
अपेक्षित पुस्तक विक्री नाही
गांधी – विनोबांच्या कर्मभूमीत संमेलन होत असल्याने उत्तम पुस्तक विक्री होईल, अशी विक्रेत्यांना अपेक्षा होती. परंतु पुस्तक विक्रीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली. सोबतच आयोजकांकडून अपेक्षित सुविधा पुरवण्यात न आल्याने अडचणींचा सामना करावा लागल्याची तक्रारही काही विक्रेत्यांनी केली.