‘आयआरसी’च्या प्रदर्शनात नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
पायाभूत सुविधा निर्माण करण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे, परंतु आर्थिक मर्यादा आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. इंडियन रोड काँग्रेसचे ७९ व्या अधिवेशानाला गुरुवारपासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात सुरुवात झाली. गडकरी यांनी येथील प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ‘आयआरसी’चे सरचिटणीस संजयकुमार निर्मल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी, मुख्य अभियंता आणि ‘आयआरसी’ आयोजन समितीचे अध्यक्ष उल्हास देबडवार, स्थानिक आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी आणि अधीक्षक अभियंता सरदेशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
‘आयआरसी’च्या अधिवेशनात अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्व तंत्रज्ञानाचे बघायला मिळत असून येथे तज्ज्ञ मंडळी शोध निबंध सादर करणार आहेत. त्यामुळे रस्ते विकासाच्या क्षेत्रात काय चालू आणि पुढे त्यात नाविन्य्पूर्ण बदल करता येतील? याविषयीची माहिती मिळणार आहे. देशभरातील बांधकाम मंत्री आणि अधिकारी, अभियंते येथे येऊन या माहितीचा लाभ रस्ते बांधकामात करतील. टाकाऊ वस्तू, कचरा आणि राखेपासून रस्ते निर्मितीचे साहित्य तयार करून बांधकामाची किंमत कमी करता येणे शक्य आहे, असेही गडकरी म्हणाले.
प्रदर्शनात सुमारे २०० स्टॉल्स असून यात व्हीएनआयटी, महावितरण, बीएसएनएल, बांधकाम खाते यांच्यासह अनेक खासगी कंपन्यांचा समावेश असून अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान सादरीकरणाचा विभागही येथे आहे.
डांबराच्या थराचा पुनर्वापर
नियमित डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची आणि जाडी वाढते. त्यामुळे घरात पावसाचे पाणी येते. यावर उपाय म्हणून रस्त्यावरील डांबराच्या थराचा वापर करून रस्ते दुरुस्ती करता येते. याविषयीचे तंत्रज्ञान विकसित झाले असून एका स्टॉल याची माहिती आहे. डांबराच्या जुन्या थराचा पुनर्वापर संबंधीचे यंत्र येथे आहे.