नागपूर : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आणि अपघाताची जणू मालिकाच सुरू झाली. या अपघातांची कारणे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची मते विचारली जात आहेत. काहींच्या मते, रस्ता बांधकामात दोष आहे तर काहींनी वेग मर्यादा यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा – नागपूर : स्टंटबाजी पडली महागात, ११ दुचाकीस्वारांवर कारवाई
यावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “समृद्धी मार्ग राज्य सरकारने बांधला असला तरी या रस्त्यांवरील अपघातांबाबत लोक मलाच प्रश्न विचारतात. हा महामार्ग बांधणारी ‘एमएसआरडीसी’ या संस्थेचा संस्थापक मीच आहे. या मार्गावरील सुधारासाठी राज्य सरकारशी पुन्हा चर्चा करणार आहे. हा राज्याचा प्रकल्प आहे. येथे केंद्राचा संबंध नसला तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. या मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे”, असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते.