लोकसत्ता टीम
वाशीम : आपल्या रोखठोक आणि बेधडक शैलीने ओळखले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी २९ सप्टेंबर रोजी वाशीम मध्ये आले असता त्यांनी जाहीर सभेत जिल्ह्यातील विकास कामावर बोट ठेवून जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पुढाऱ्यांचे चांगलेच कानही टोचले. त्यांच्या भाषणाच्या अनेक चित्रफीत सध्या सोशल मीडियावर प्रसारीत होत आहेत.
वाशीम शहरातील पाटणी कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भर सभेत कंत्राटदारांना त्रास देऊ नका, त्यांच्याकडून चांगले काम करून घ्या. रस्त्यावर पडलेले खड्डे बघून मला वाईट वाटले. लोक माझ्याकडे नव्हे तर खडयाकडे पाहत असल्याचा खोचक टोला त्यांनी नेत्यांना दिला. आमदार राजेंद्र पाटणी यांनी सांगितले की, नगर पालिकेकडे पैसे नाहीत. तेव्हा गडकरी यांनी भर सभेत जहर खायला पैसे असतील तर बघा ! असा प्रश्न उपस्थित करून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांना आरसा दाखविला.
आणखी वाचा-वर्धा : रुग्णालयासाठी गावातील वृद्ध रस्त्यावर
केवळ शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचे सापळे झाली आहेत. कोट्यवधी रुपयांची कामे दरवर्षी करूनही एकही रस्ता चांगल्या अवस्थेत नाही. सध्या समाजमाध्यमांवर गडकरी यांच्या अनेक चित्रफीत प्रसारीत होत असून जिल्ह्यातील कमिशनबाजी, टक्केवारी, वाढता भ्रष्टाचार यावरून चर्चेचे फड रंगत आहेत. गडकरी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी वाट्टेल तेवढा निधी देण्याची ग्वाही देऊन एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला. त्यांनी केलेल्या विनंतीचे पालन जिल्ह्यातील किती नेते करणार हे येणारा काळच ठरवेल.