नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणजे चालता बोलता ज्ञानकोष, असे त्यांच्या बाबतीत म्हटले जाते. त्यांची प्रत्येक विषयावर ठाम मते असतात. आपल्या अफलातून भाषणांसाठी ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अनेकदा राजकीय नेत्यांनाही आपल्या भाषणांमधून आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या स्पष्टपणामुळे ते नेहमीच चर्चेतही राहतात. सध्या त्यांच्या फेसबुकवर एक रिल्स अत्यंत व्हायरल होत आहे. त्यात गडकरींनी जीवनाचा आनंद सांगितला आहे. यामध्ये गडकरींनी एक फार मोठी खंत व्यक्त केली. आज त्यांच्याकडे सर्वकाही असूनही पूर्वीचा जीवनातील आनंद हरवल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केले. गडकरी नेमके काय म्हणाले पाहूया.
गडकरींच्या बागेतील संत्री रामदेवबाबांच्या प्रकल्पात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उपराजधानीमधील मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब परिसरात असलेले पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्कचे रविवार ९ मार्चला उद्घाटन करण्यात आले. योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजली फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून पतंजली उद्योग समूहाकडून महाराष्ट्रात १० हजार रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१६ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडकरींनी अनेक किस्से सांगितले. गडकरी म्हणाले, त्यांचे संत्र्याचे शेत आहे. त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून येथील संत्री ते रामदेवबाबांच्या पतंजली फूड पार्कमध्ये देणार आहेत. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल असेही गडकरी म्हणाले.
गरिबी होती पण…
गरिबी होती, राहायला घर नव्हते, खायला अन्न नव्हते, घरात झोपायला पुरेशी जागा नव्हती, मुलांचे शुल्क भरायला पैसे नव्हते, सगळे काही नव्हते पण तेव्हा घरात आनंद होता. आज बंगला झाला, मरसिडीज गाडी, हेलीकॉप्टर, विमान आले परंतु आनंद जेवढे होते ते कमी झाले. कारण सत्ता आणि संपत्ती ज्ञान आणि सौदर्य या चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत परंतु या चारही गोष्टी नश्वर आहेत. जे काल होते ते आज नाही आणि आज आहे ते उद्या नाही. काळाच्या ओघात या गोष्टी संपत असतात.