नागपूर: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गुरूवारी संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर नागपूरकर देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. त्यांतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत महत्वाचे मत समाज माध्यमावर व्यक्त केले. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विकासपुरूष अशी प्रतिमा असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दोघेही मुळ नागपूरकर आहेत. नागपूरसह राज्याच्या विकासात दोघांचीही भूमिका महत्वाची आहे. दरम्यान गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांतील मुख्यमंत्री मोठ्या संख्येने हजर होते.
हेही वाचा >>> महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागण्याची भिती, नाना पटोले म्हणतात, ‘नवीन सरकार गुजरातधार्जिणे…’
कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांनी स्वत:च्या फेसबुक खात्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचे काही छायाचित्र पोस्ट केले. या पोस्टवर नितीन गडकरी यांनी लिहिले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे हृदयपूर्वक अभिनंदन. राज्यातील यशस्वी कार्यकाळासाठी त्यांना असंख्य शुभेच्छा. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला मिळालेला भव्य विजय हा खऱ्या अर्थाने सुशासन, विकास आणि महाराष्ट्राच्या समस्त जनतेचा विजय आहे. पुन्हा एकदा भाजपचा मुख्यमंत्री होताना पाहणे ही माझ्यासह समस्त भाजप कार्यकर्त्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस सारखा मेहनती, कार्यकुशल, जिद्दी- चिकाटीने कार्य तडीस नेणारा आणि जमीनस्तरावर पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या रुपाने काम करत पुढे आलेला नेता महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल, यात शंकाच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या यापूर्वीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली. यापुढील ५ वर्षांतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास आहे.
हेही वाचा >>> गोंदिया : प्रफुल्ल पटेलांच्या गृहजिल्ह्यातून मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार?
राजकारणावर मार्मिक भाष्य डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले होते की, राजकारणात प्रत्येकाला काही ना काही असंतोष असतो. उदाहरणार्थ, जो नगरसेवक बनला आहे, तो आमदार होण्याच्या महत्त्वाकांक्षेने दुःखी असतो. जो आमदार झाला आहे, त्याला मंत्री होण्याची इच्छा असते, आणि जो मंत्री बनला आहे, त्याला मनासारखे खाते न मिळाल्याचे दुःख असते. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पदावरून बाजूला व्हायची भीती असते.