लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पहिल्या ‘रोड ट्रेन’ला नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. वोल्वो ट्रक्स आणि डेल्हीव्हरी लिमिटेडने हे वाहन दळणवळण उद्योगातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी तयार केले आहे. ‘रोड ट्रेन’ची संकल्पना २०२० मध्ये मांडण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय परिवहन खात्याने २५.२५ मीटर लांबीपर्यंतची वाहने चालविण्याची परवानगी दिली. यात एक ट्रॅक्टर युनिट असते जे दोन किंवा अधिक ट्रेलर ओढते, ज्यामुळे एकाचेळी अधिक प्रमाणात मालवाहतूक होते.

वोल्वो ट्रक्सच्या ‘रोड ट्रेन’मध्ये एकत्रितपणे १४४ घनमीटर कार्गो वाहून नेण्याची क्षमता आहे. ही क्षमता सेमी-ट्रेलर्सपेक्षा ५० टक्के अधिक आहे. अनेक प्रशिक्षण आणि चाचण्यानंतर या ‘रोड ट्रेन’ला नागपूर आणि भिवंडी ते दिल्ली या शहरादरम्यान धावण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) कडून प्रमाणित करण्यात आले आहे. या रोड ट्रेनमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टम (ईबीएस), स्थिरता नियंत्रण (ईएसपी), ३६०-डिग्री कॅमेरा, ट्रेलरवरील सेल्फ-स्टीअरिंग एक्सल, लोड मॉनिटर, डाऊनहिल क्रुझ कंट्रोल आणि चांगल्या स्थिरतेसाठी स्ट्रेच ब्रेक अशी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.

व्हीई कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ विनोद अग्रवाल म्हणाले, ही रोड ट्रेन भारतीय बाजारपेठेसाठी महत्त्वाची आहे. रस्ते वाहतूक अधिक कार्यक्षम आणि परवडणारी बनवण्यासाठी ती डिझाइन करण्यात आली आहे. सरकारच्या गतिशक्ती मास्टर प्लॅनशी सुसंगत आहे. या उपक्रमाबद्दल आम्ही नितीन गडकरी आणि रस्ते वाहतूक मंत्रालय, एआरएआय यांचे आभारी आहोत. भारतात आणखी जागतिक नवोपक्रम आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

डेल्हीवरी चे सह-संस्थापक आणि मुख्य लोक अधिकारी सूरज सहारन म्हणाले, वोल्वो ट्रक्ससोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत करण्याची उत्सुकता आहे. लांब पल्ल्याच्या लॉजिस्टिक्सला अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवण्यात वोल्वोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लॉजिस्टिक्स ऑपरेशन्ससाठी रोड ट्रेन्स हे पुढील पाऊल आहे. भारतातील एक्सप्रेसवे नेटवर्क वेगाने वाढत असताना, आम्ही ते अधिक मार्गांवर आणण्याची योजना आखत आहोत.

वोल्वो ट्रक्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख दिनकर म्हणाले, आम्ही केवळ उत्पादकता आणि किफायतशीरतेवर लक्ष केंद्रित करत नाही तर भारतीय रस्त्यांवर सुरक्षितपणे हे उपाय अंमलात आणणे यालादेखील आमचे प्राधान्य आहे. मंत्रालयाने दिलेल्या प्रमाणपत्राबद्दल मी त्यांचा आभारी आहे.