लोकसत्ता टीम
नागपूर : राजकारणात तुमच्याकडे किती पदव्या आहेत, यापेक्षा तुम्ही राजकीय डावपेचात किती तरबेज आहात याला अधिक महत्व असते. काही नेते शिक्षण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात तरबेज असतात. भाजपचे नागपूरकर नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे यापैकीच एक. गडकरी यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध सहा विद्यापीठांनी डी.लिट. पदवी देऊन सन्मानित केले. त्याचा उल्लेखही ते अनेक कार्यक्रमात करतात. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यात मागे नाहीत. त्यांना जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित केले आहे. त्यांना मिळालेली ही दुसरी मानद डी.लिट आहे.
आणखी वाचा-एमपीएससी: बहुचर्चित परीक्षेचा निकाल अखेर जाहीर
नागपुरातील हे दोन्ही नेत्यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कतृत्व सिद्ध करून नागपूरचा गौरव वाढवला आहे. फडणवीस यांनी सलग पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सक्षमपणे सांभाळले तर गडकरी यांनीही रस्ते बांधणी क्षेत्रात आपल्या कामाची छाप उमटवली. त्यांना सहा विद्यापीठांनी डी.लिट पदवी प्रदवी प्रदान केली. पण ते ‘डॉक्टर’ लावत नाहीत.आता फडणवीस यांनाही जापानच्या विद्यापीठाने या बहुमानाने सन्मानित केले. यापूर्वी त्यांना २०१८ मध्ये ओसाका सिटी युनिव्हर्सिटी, जपान कडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सामाजिक-आर्थिक विकासासाठी ही पदवी बहाल केलेले फडणवीस हे पहिले भारतीय होते.