लोकसत्ता टीम

नागपूर : मी कोणत्याही कंत्राटदारांकडून कमिशन घेत नाही. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करेल आणि कंत्राटादारांना काळ्या यादीत टाकेल, असा सज्जड इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. वाडी येथील चारपदरी उड्डाणपुलाचे आणि व्हेरायटी चौक ते बोले पेट्रोल पंप चौक व विद्यापीठ चौक ते वाडी नाका चौक दरम्यान ४.८९ किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण गडकरी यांनी शनिवारी केले. याप्रसंगी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, आजकाल माझा बराच वेळ अधिकारी, कंत्राटदारांच्या मागे लागण्यात जातो. मला अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करायचे आहे आणि कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकायचे आहे. मी कोणत्याही कंत्राटादारकडून कमिशन घेत नाही. मी नेहमी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर टीका करीत असलो तरी या प्रकल्पाचे काम करणाऱ्या इएनटी कंपनीचा, अभियंत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करणार आहे. त्यांनी दोष काढायला जागा ठेवली नाही. उड्डाणपूल उत्तम दर्जाचा झाला आहे. दोन ते तीन मिनिटांत शहरात जाता येणार आहे. रवीनगरचा उड्डाणपूल झाल्यावर थेट व्हेरायटी चौकात पोहोचता येणार आहे. शहरातून बाहेर निघण्यासाठी फार तर १५ मिनिटे लागतील, असेही गडकरी म्हणाले.

आणखी वाचा-हवामान खात्याकडून पावसाचा इशारा, पण आकाशात मात्र सूर्याचा…

अमरावतीपर्यंत सहा पदरी सिमेंट रस्ता

वाडीपासून अमरावतीपर्यंत सहा पदरी सिमेंट रस्ता तयार करण्यात येईल. या रस्त्यांचा डीपीआर बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्यास मंजुरी देणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. दरम्यान, शनिवारी नागपूर-अमरावती महामार्गावर वाडीपर्यंत २.३ किलोमीटरच्या चारपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाची किंमत २४६ कोटी रुपये आहे.

पुणे, चेन्नईतही चारस्तरीय उड्डाणपूल

आशिया खंडातील पहिला चारस्तरीय उड्डाणपूल नागपुरात उभारण्यात आला आहे. अशाच प्रकारचे पूल पुणे आणि चेन्नई येथे उभारण्यात येणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केली.

आणखी वाचा-निवडणुकीच्या निमित्ताने मराठीचा भाग्योदय, विकास मंडळांचा कधी?

नागपुरातील एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या ५.६७ किलोमीटर लांबीच्या डबलडेकर उड्डाणपुलाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, नागपुरात चारस्तरीय उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. अशा प्रकारचा हा आशियातील पहिला पूल आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पुण्यात ५० हजार कोटींचे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. ते पूलदेखील अशाच प्रकारचे आहेत. तसेच चेन्नईमध्ये १२ हजार कोटींच्या पुलांचे काम सुरू आहे. तेही याच प्रकारातील आहेत. देशातील बदलत्या पायाभूत सुविधांमुळे लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.