अमरावती :  समाजकारण म्हणजेच राजकारण आहे. हे करणाऱ्याला पोस्टर लावण्याची गरज भासत नाही. मीही लोकसभेत निवडून आलो, पण लोकांना सांगितले की, माझ्या हिशेबाने राजकारण चालेल, तुम्हाला मत द्यायचे असेल, तर द्या, नाही दिले तरी चालेल. जो मत देईल त्याचेही काम करेल, नाही देणार त्याचेही करेल. मी तत्वांशी तडजोड करणार नाही. जात  पुढारी निर्माण करतात. जनता जातीयवादी नाही, पुढारी जातीयवादी आहेत, ते आपल्या स्वार्थासाठी जात समोर करतात, असे परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. यावेळी खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, प्रवीण पोटे, नवनियुक्त आमदार संजय खोडके, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, मागासलेपण हा राजकारण्यांचा आवडीचा विषय आहे. आजकाल कोण मागास आहे, याची स्पर्धाच सुरू झाली आहे. मी अनेकवेळा उत्तर प्रदेशात जातो. महाराष्ट्रात जशी कुणबी, मराठा ही प्रभावशाली जात आहे, तशी तिथे ब्राम्हण जात आहे. मी एका सभेला गेलो होतो, तेव्हा संचालनकर्त्यांने माझी ओळख पंडित नितीन गडकरी अशी करून दिली, मी त्याला बोलावून विचारले, तर तो म्हणाला, ‘पंडित अटलबिहारी वाजपेयी के बाद हमारे दिल मे अगर कोई नाम है, तो नितीन गडकरी का नाम है,’ मी त्याला स्पष्टच सांगितले, मला पंडित म्हणू नका.

वेगवेगळ्या कारणांनी खालचे वातावरण बदलत चालले आहे. ते सुधारण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. माणूस हा जातीने मोठा नाही, तर त्याच्या गुणाने मोठा आहे. या समाजातील जातीयवाद अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे. नितीन गडकरी म्हणाले, राजकीय कार्यकर्त्यांनी आजच्या काळात सामाजिक संवेदनशीलता जपणे महत्वाचे आहे. राजकारण म्हणजे केवळ पाच वर्षांची निवडणूक नाही. आज आपल्याला राजकारणाची पुनर्व्याख्या करणे आवश्यक आहे. दुर्देवाने खूप मोठा विरोधाभास आहे. प्रत्येकाला उमेदवारी पाहिजे. मी या सगळ्यातून गेलो आहे. एवढा मोठा खर्च केला जातो, हे आता थांबले पाहिजे.

Story img Loader