“देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेले काम सोडले, तर कुठलेही काम पैलतिरापर्यंत पोहचू शकलेले नाही, गडकरींनी रस्ते चांगले केले, भाजप आता त्यांच्याही मागे लागला आहे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरावतीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद बैठकीत बोलताना जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर तोंडसुख घेतले, ते म्हणाले “गेल्या वेळी नरेंद्र मोदी यांची लाट होती, अन्नधान्य, कपड्यांवर कर नव्हता, चारशे रुपयांचे गॅस सिलिंडर बाराशे रुपयांवर जाईल, असे वाटले नव्हते, २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळतील, असे आश्वासन त्यांनी दिले, पण बेघरांची संख्या कमी झालेली नाही. केंद्र सरकारविषयी लोकांचा भ्रमनिरास झाला आहे”.
हेही वाचा >>> नागपूर : आंबटशौकीन वृद्ध डॉक्टरला अश्लील ‘व्हिडिओ कॉल’ पडला १६ लाखांचा ; तरुणीने दिली छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी
नितीन गडकरी यांचे कौतूक करताना जयंत पाटील म्हणाले, “केंद्र सरकार कितीही दावे करीत असले, तरी नितीन गडकरींनी रस्ते विकासासाठी केलेले काम सोडले, तर कुठलेही काम पैलतिरी गेलेले नाही. भाजपजवळ कुठलाही कार्यक्रम नाही. आम्ही एवढे पक्ष फोडले, एवढ्या राज्यांमध्ये सत्तापालट केला, आमची सत्ता नसली, तरी आम्ही पाहिजे, ते करून दाखवू, असे सांगत भारतीय लोकशाही आणि मतदारांचा भाजपने अवमान केला आहे”.जयंत पाटील यांनी राज्य सरकारवरही टीका केली. ते म्हणाले,“ राज्यात कुणीही सुखी समाधानी नाही. अनेक पानवाले, टपरीवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने विधानसभेपर्यंत पोहचले. मंत्री झाले. त्यांनी शिवसेनेकडे पाठ फिरवून बाळासाहेबांच्या पुत्राला सत्तेवरून खाली खेचले, ही गोष्ट शिवसैनिकांमध्ये घर करून राहणार आहे, हे एवढे सोपे आहे, असे समजू नका”.
हेही वाचा >>> चंद्रपूरच्या मिनाक्षी वाळकेंचा ‘बांबू गणेश’ इंग्लंडच्या दूतावासात
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच कामाला लागा तसेच किमान ५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्याला राष्ट्रवादीची उमेदवारी द्या, असे जयंत पाटील यांनी सांगितले. संजय खोडके यांच्या नेतृत्वात अमरावती शहरात राष्ट्रवादीची चांगली संघटना निर्माण झाली आहे, नक्कीच आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास या निमित्ताने वाटतो, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.