भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जेवढे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात तेवढच ते खाद्य प्रेमी म्हणूनही सर्वपरिचित आहेत. ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमात याचा जाहीर उल्लेखही करतात. अनेक सेलेब्रेटी गडकरींना भेटायला त्यांच्या निवास्थानी येतात तेव्हा ते त्यांना विविध पदार्थ पोटभर खाऊ घालतात. त्याचे अनेक किस्सेही गडकरी सांगत असतात. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच गडकरींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा त्यांनी सचिनला पोहे खाऊ घातले. ही बातमीही गडकरी यांनीच माध्यमांना दिली होती. गडकरींच्या संकल्पनेतूनच नागपुरात खाऊ गल्लीही सुरू झाली. नागपूरचे सावजी मटण असो किंवा त्यांच्या आवडीचे अन्य पदार्थ. गडकरी याचे देश-विदेशात मार्केटिंग करीत असतात. त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये नागपूरच्या प्रसिद्ध पाटोडीचाही समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाटोडीचे दुकान आहे. आता तेथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत उभारली जाणार आहे त्यामुळे पाटोडी विक्रेत्यांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र त्यांच्या मदतीला गडकरी धाऊन आले.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला नागपूरचे खासदार म्हणून नितीन गडकरीही उपस्थित होते. आपल्या भाषणादरम्यान गडकरी यांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत भाष्य केले. या कार्यालयाशी जुळलेल्या आठवणींनाही उजाळा देताना त्यांनी पाटोडीचा उल्लेख केला. ते म्हणाले “जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच जिल्हा न्यायालयाची इमारत आहे. तेथे आम्ही राजकीय आंदोलनात दाखल झालेल्या विविध प्रकरणाच्या सुनावणीसाठी येत होतो. तास न तास येथे थांबावे लागत असे, त्यावेळी भूक लागली की पाटोडी खायचो. आता या परिसरात नवीन इमारत बांधली जाणार, तेव्हा या पाटोडी विक्रेत्यांसाठीही थोडी जागा ठेवा,” गडकरींनी केलेल्या विनंतीला उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी मान देत पाटोडी विक्रेत्यांना नवीन इमारत परिसरात जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले. अशा प्रकारे गडकरींच्या खाद्यप्रेमाचा फायदा पाटोडी विक्रेत्यांना झाला. त्यांचे स्थलांतर टळले.
हेही वाचा – ताडोबातील व्याघ्रदर्शनासाठी आता ‘रोपवे टूरिझम’…
यापूर्वीही गडकरी यांनी पदपथावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी वेगळी जागा देण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. खुद्द गडकरी यांच्या वर्धामार्गावरील निवासस्थानाजवळच रस्त्यालगतची मोकळी जागा खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दिली आहे. फुटाळा तलावाजवळ तर त्यांनी खाद्य मॉलची उभारणी करण्याची घोषणा केली आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. पदपथावरील अतिक्रमण दूर करणे आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देणे यासोबतच नागरिकांनाही स्वच्छ आणि मोकळ्या जागेत पदार्थ खाण्याचा आनंद मिळणे हा या उपक्रमांचा एक भाग आहे. नागपूरकरांनाही याचा फायदा होत आहे.