नागपूर : भाजप उमेदवार नितीन गडकरींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण- पश्चिम मतदारसंघाहून जास्त मताधिक्य कृष्णा खोपडेंच्या पूर्व नागपूर मतदारसंघातून मिळाले. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंच्या पश्चिम मतदारसंघातून भाजपने जास्त मताधिक्य घेतले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघांकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण-पश्चिम हा फडणवीसांचा मतदारसंघ आहे. येथून गडकरींना सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३३ हजार ५३५ इतकेच मताधिक्य मिळाले. याउलट खोपडेंच्या पूर्व नागपूर मतदारसंघात गडकरींना सर्वाधिक ७३ हजार ३७१ मताधिक्य मिळाले. दक्षिण नागपुरातून गडकरींना २९ हजार ७१२, मध्य नागपुरातून २५ हजार ८६१, पश्चिम नागपुरातून ६ हजार ६०४ एवढे मताधिक्य मिळाले. उत्तर नागपुरात गडकरींच्या तुलनेत ठाकरे यांना तब्बल ३२ हजार २१५ इतके मताधिक्य मिळाले. ठाकरे हे पश्चिम नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरीही भाजपने त्यांच्या मतदारसंघातून ६ हजारांहून जास्त मते घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे. फडणवीस यांच्या मतदारसंघातून भाजपला ३३ हजार ५३५ इतकेच मताधिक्य मिळाल्याने भाजपच्या गोटातही विविध चर्चा रंगल्या आहेत.
हेही वाचा…उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, जालना, नागपुरात; ‘या’ जिल्ह्यात मृत्यूची नोंद…
दक्षिण-पश्चिममध्ये भाजपची चिंता वाढली?
दक्षिण-पश्चिम मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून तीन वेळा फडणवीस येथून विजयी झाले आहेत. विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे आणि आशीष देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी सर्वाधिक विकास निधी दिलेल्या मतदारसंघात दक्षिण-पश्चिमचाही समावेश आहे. येथे भाजप आणि संघाचीही मोठी शक्ती आहे. गडकरी स्वतः याच मतदारसंघात मागील पाच वर्षांपासून राहत आहेत. त्यानंतरही भाजपला येथून ३३ हजारांचेच मताधिक्य मिळाल्याने भाजपची चिंता वाढली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांना येथून ४९ हजारांचे मताधिक्य मिळाले होते, हे विशेष.
हेही वाचा…लोकजागर: पूरनियंत्रणाचा ‘पोरखेळ’!
विधानसभानिहाय मिळालेली मते
मतदारसंघ नितीन गडकरी विकास ठाकरे मतांचे अंतर
(भाजप) (काँग्रेस)
दक्षिण-पश्चिम १,१३,५०१ ७९,९६६ ३३,५३५ (भाजप पुढे)
नागपूर दक्षिण १,१२,४५७ ८२,७४५ २९,७१२ (भाजप पुढे)
नागपूर पूर्व १,४१,३१३ ६७,९४२ ७३,३७१ (भाजप पुढे)
नागपूर मध्य ९६,९०५ ७१,०४४ २५,८६१ (भाजप पुढे)
नागपूर पश्चिम ९८,४४२ ९१,८३८ ६,६०४ (भाजप पुढे)
नागपूर उत्तर ९०,१९१ १,२२,४०६ -३२,२१५ (काँग्रेस पुढे)
पोस्टल बॅलेट २,२१८ १,४८३ ७३५
एकूण ६,५५,०२७ ५,१७,४२४ १,३७,६०३