नागपूर : संभाजीनगर-नगर-पुणे असा २३० किलोमीटर महामार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. हा महामार्ग राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हा रस्ता बांधणार आहे. त्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात शुक्रवारी नागपुरात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले.
सध्याच्या संभाजीनगर-नगर-पुणे महामार्गासोबतच नवीन २३० किलोमीटरचा एक्सप्रेस वे उभारण्याचे प्रस्तावित आहे. आज याबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाली. याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, युतीचे सरकार असताना आम्ही मुंबई ते पुणे महामार्ग उभारला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात आले. या महामार्गापासून एमएसआरडीसीला पाहिजे तसा लाभ मिळाला नाही. त्यावेळी काय केले पाहिजे असा प्रश्न सरकारला पडला. ही गोष्ट शरद पवार यांना समजली. त्यांनी मला फोन केला, राजकारण बाजूला ठेव, एमएसआरडीसी तुझे अपत्य आहे. ते जगले पाहिजे, असे पवार म्हणाले. त्यानंतर मी एक मॉडेल तयार केले आणि जुन्या महामार्गाला नवीन महामार्ग जोडला. त्यामुळे फायदा झाला. हा किस्सा सांगत असताना देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर होते.
हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांच्याही भरपूर कुंडल्या माझ्याकडे…. नाना पटोले गुपित उघड करणार…?
फडणवीस म्हणाले, पुण्याचे वळण मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. संभाजीनगर ते पुणे नवीन एक्सप्रेस वे पुण्याच्या वळण मार्गला(रिंग रोड) जोडला जाणार आहे. त्यामुळे नागपूरहून संभाजीनगरमार्गे पुण्यात पोहचताना वाहतुकीची कोंडी अजिबात होणार नाही, याची काळजी आधीच घेण्यात आली आहे. प्रस्तावित रस्त्याची लांबी-२३० किमी असून त्यावरून धावणाऱ्या वाहनांसाठी वेग मर्यादा १२० किमी प्रतितास इतकी असेल. प्रकल्पासाठी ३, ७५२ हेक्टर जमीन लागणार आहे. हा एक्स्प्रेस वे पर्यावरणपूरक, नेट झिरो कार्बन आणि नेट पॉझिटिव्ह ऊर्जा प्रकल्प म्हणून बांधला जात आहे. लवकरच भूसंपादन सुरू केले जाणार आहे.