नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. केंद्र व राज्य शासनातील चुकीच्या गोष्टीही ते सहज बोलून जातात. शुक्रवारी त्यांनी नागपुरातील एका परिषदेत असेच वक्तव्य केले. गडकरी म्हणाले, दिल्लीत हल्ली वायू प्रदूषण गंभीर समस्या आहे. मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री आहे. आणि वायू प्रदुषणाला माझे मंत्रालय जबाबदार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील खामला येथील अर्जुना सेलिब्रेशन येथे ऊर्जा व पर्यावरण विषयावर आधारित ‘ऊर्जावरण – २०२५’ या परिषदेत नितीन गडकरी उपस्थित होते.  गडकरी म्हणाले, पर्यावरनीय बदल ही संपूर्ण जगासाठी समस्या आहे. भारतातही जल, ध्वनी आणि वायू प्रदुषण चिंतेची बाब आहे. दिल्लीत वायू प्रदुषण गंभीर समस्या आहे. मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री आहे. आणी माझे मंत्रालय वाहनाशी संबंधित असल्याने देशातील ४० टक्के वायू प्रदुषणाला आमचे (भूपृष्ठ वाहतूक) मंत्रालय जबाबदार आहे.

हेही वाचा >>>मी दिव्यांगांशी बेईमानी करणार नाही…बच्चू कडूंनी अखेर सरकारी पदाचा राजीनामा…

केंद्र सरकार प्रदुषणावर उपाययोजना करत आहे. पण आमच्या मंत्रालयाने पर्यावरण रक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देत रस्ते बांधणीत वेस्ट मटेरियलचा वापर करून पहिले पाऊल टाकले आहे.’ वातावरणातील बदलांमुळे आज जग अनेक समस्यांचा सामना करत आहे. त्यात वाहतुकीसाठी पर्यायी इंधनाचा मार्ग निवडणे गरजेचे आहे. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो- सीएनजीच्या वापराला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे प्रदुषण कमी होईल. आपल्या देशात आज २२ लाख कोटी रुपयांचे फॉसिल फ्युएल आयात केले जाते. हा खर्च कमी करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा आहे, याचाही गडकरी यांनी उल्लेख केला.

हेही वाचा >>>आदिवासी मंत्र्यांना मीच राजकारणात आणले, गडकरींनी सांगितला किस्सा

रस्ते निर्मितीत नवनवीन प्रयोग…

रस्ते आणि इमारतींच्या बांधकामात वेस्ट मटेरियलचा वापर करणे काळाची गरज आहे. बांधकामावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. मजबुत व चांगल्या गुणवत्तेचे रस्ते निर्माण करणे तसेच सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा घरांची निर्मीती करणे महत्त्वाचे आहे. वाहतूक मंत्रालयाने अनेक ठिकाणी बांबू क्रॅश बॅरियर निर्माण करून आम्ही रस्ते निर्मितीमधील खर्च तर कमी केलाच, शिवाय पर्यावरण रक्षणातही हातभार लावला आहे. स्टीलच्या ऐवजी बांबुचा वापर रस्त्यांमध्ये होऊ लागला आहे. मनसर येथे राष्ट्रीय महामार्गावरील एक टप्पा बायो-बिटुमेनचा वापर करून तयार करण्यात आला आहे, असेही गडकरी म्हणाले. दिल्ली ते चंदीगड, मुंबई ते दिल्ली या महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन कचरा वापरण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari statement on air pollution nagpur news mnb 82 amy