बुलढाणा : नेते मंडळी, सरकार बांधत असले तरी रस्ते, महामार्ग यांचे खरे मालक करोडो भारतीयच असल्याचे भावनिक प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आपण ‘मालपाणी’ घेत नाही, ‘लक्ष्मी दर्शन’ करत नाही म्हणूनच दर्जेदार महामार्ग उभारता आले, असे सांगून नित्कृष्ट बांधकाम करणाऱ्याना ‘रगडणार’ च अशी तंबी देखील त्यांनी दिली.
खामगाव तालुक्यातील विविध राष्ट्रीय मार्ग व शेलद ते नांदुरा मार्गाचे लोकार्पण आज दुपारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित नेते, पदाधिकारी व नागरिकांच्या साक्षीने त्यांनी जिल्ह्यातील विविध मार्गासाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची घोषणा केली. दर्जेदार रस्त्यावर आपला पाहिल्या पासूनच जोर राहिला आहे. किंबहुना यासाठी आपण आग्रही आहोत. एकवेळ अशी आली होती की एका नित्कृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारण्याची वेळ आली होती, अशी मजेदार आठवण गडकरी यांनी सांगितली.
हेही वाचा >>>सुधीर मुनगंटीवार गटाचे वर्चस्व; हंसराज अहीर समर्थकांना डावलले!
जे काही रस्ते आहेत हे संपूर्ण भारताची संपत्ती आहे. आमदार, खासदार, मंत्री हे सगळे जनतेची सेवक असल्याचे गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले.यावेळी खासदार प्रतापराव जाधव, श्रीमती रक्षा खडसे आमदार आकाश फुंडकर, वसंत खंडेलवाल, माजी आमदार चैनसुख संचेती, यांची प्रमुख उपस्थिती होती.