नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या शिर्डीपर्यंतच्या ५२० किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल भगतिसिंग कौश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना समृद्धी महामार्ग विदर्भ-मराठवाड्यासाठी वरदान ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी आणि एमएसआरडीसीचेही आभार मानले.
“समृद्धी महामार्ग वरदान ठरेल”
“बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपल्या विदर्भ आणि मराठवाडाच्या विकासासाठी आवश्यक आहे. मला आनंद आहे की, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी या महामार्गाची कल्पना मांडली. एकनाथ शिंदे त्यावेळी मंत्री होते. त्यांनी या महामर्गाची जबाबदारी स्वीकारली आणि आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
हेही वाचा – “एका व्यक्तीचा पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास होता, त्याचं नाव…”, मोदींसमोर फडणवीसांचं वक्तव्य
“एमएसआरडीसीबरोबर माझं भावनिक नातं”
“एमएसआरडीसीबरोबर माझं एक भावनिक नातं राहिलेलं आहे. मी मंत्री असताना मुंबईत ५५ उड्डाण पूल आणि देशाताला पहिला मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे एमएसआरडीसीनेच बनवला होता. आज एमएसआरडीसीने हा समृद्धी महामार्गही बनवला आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हा महामार्ग तयार करताना तलाव, नदी आणि नाले सुद्धा तयार करण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यासाठी सुद्धी मी एमएसआरडीसीचे आभार मानतो”, असेही ते म्हणाले.
“नागपूर-पुणे अंतर केवळ ६ तासांत पूर्ण होईल”
“या महामार्गाला जोडून आम्ही औरंगाबाद ते पुणेदरम्यान महामार्ग बनवणार आहोत. लवकरच या कामाची सुरुवात होईल. या महामार्गामुळे नागपूर ते पुणे अंतर केवळ ६ तासांत पूर्ण होईल. याचबरोबर आम्ही सुरत चेन्नई, इंदौर-हैदराबाद, हैदराबाद-रायपूर, नागपूर-विजयवाडा आणि पुणे-बंगळूरू असे आणखी सहा महामार्ग बनवणार आहोत. हे महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – गडकरींबरोबरच देवेंद्र फडणवीसही आता रस्ता निर्मितीचे शिल्पकार
पंतप्रधान मोदींचे मानले आभार
“नागपूर एम्समुळे विदर्भ, मराठवाडा आणि छत्तीसगडच्या नागरिकांना उत्तम वैद्यकीय व्यवस्था मिळणार आहे. याचबरोबर आयआयएम नागपूरमध्ये स्थापन करण्यात आले आहे. त्याची इमारत बघण्यासाठी देशभरातील लोकं येत आहेत. हे दोन्ही प्रकल्प नागपूरमध्ये देऊन पंतप्रधान मोदींनी आपल्यासाठी मोलाचे काम केलं आहे, यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो”, असेही ते म्हणाले.