वर्धा : राज्यकर्ते आश्वासन देऊन मोकळे होतात, याचा प्रत्यय राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नागरिक घेत असतात. घोषणा तर झाली पण काम केव्हा होणार, याची प्रतिक्षा लागून असणारा नागरिक प्रत्येक गावात सापडणार, असे कोणत्याही पक्षाच्या सत्तेबाबत नेहमी बोलल्या जाते. पण गडकरी बोले आणि रस्ते मंडळ हाले, असा अनुभव जिल्ह्यातील नागरिक घेतात.
वर्धा जिल्ह्याच्या चारही बाजूने राष्ट्रीय व राज्य मार्गाचे जणू जाळेच विणल्या गेले आहे. त्यातच समृद्धी व आता शक्तीपीठ मार्ग म्हणून वर्धा जिल्हा विदर्भाचे लॉजिस्टिक केंद्र म्हणून मुख्यमंत्री घोषित करून गेले. गडकरी यांनीच मदत केल्याने मार्ग मार्गी लागले असे माजी खासदार रामदास तडस नेहमी सांगत असतात. आता त्यात पुन्हा एका आमदाराची भर पडली आहे.
देवळीचे भाजप आमदार हे रामदास तडस यांना सोबत घेत गडकरी यांच्या नागपूर निवासस्थानी पोहचले. मागणी पत्र सादर केले. त्यात देवळी दिघी ते बोपापूर मार्ग सुधारणा, सालोड पडेगाव चिकणी रस्ता सुधारणा व दहेगाव पुलगाव ते अमरावती जिल्हा सीमा यांस जोडणारा मोठा पूल अशी तीन मुख्य कामे होती. तेव्हा राजाभाऊ यात महत्वाचे काम कोणतं, अशी विचारणा गडकरी यांनी केली. तेव्हा पूल आवश्यक असे आमदार बकाने म्हणाले. त्यावर जा, मतदारसंघात घोषणा कर. विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले, म्हणून घोषित कर. गडकरी यांचा असा तत्पर प्रतिसाद मिळाला आणि आमदार बकाने हरखून गेले. सोबत असलेले रामदास तडस पण दिलासा मिळाला म्हणून आनंदी.
पण गडकरी आता देण्याच्या मूड मध्ये असल्याचे दिसून आले. तेव्हा आमदार बकाने यांनी पुन्हा एक समस्या मांडली. त्यांनी नमूद केले की देवळीत एंट्री करतांना जो मार्ग लागतो तो अरुंद आहे. परिणामी अपघात होतात. आता हे एंट्री स्थळ ब्लॅक स्पॉट म्हणजे धोकादायक म्हणून घोषित होवू शकते. परिणामी वाहतूक ठप्प होण्याचे संकट. ते दूर करा, अशी विनंती बकाने यांनी केली.
तेव्हा गडकरी यांनी आकस्मिक काम असेल तर त्याची तरतूद केंद्रीय रस्ते परिवहन खात्याकडे असल्याचे नमूद केले. हा विभाग म्हणजे, ‘ वन टाइम इम्पहृमेंट ‘ असा आहे. एकाच झटक्यात काम मोकळे करण्याची ही बाब असते. ती मान्य झाली. म्हणजे ७५ कोटी रुपयाच्या कामापैकी ५० कोटी रुपयाचे काम मंजूर आणि परत ब्लॅक स्पॉट होण्याचा धोका टळणारे काम पण मंजूर. द्यायला गेलो निवेदन व हाती घेऊन आलो मंजुरीचे आवेदन, अशी स्थिती आमदार राजेश बकाने यांची झाली.