नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देशभरात भाजपचा प्रसिद्ध चेहरा आहेत. रस्त्याच्या विकासाच्या केलेल्या कार्यामुळे त्यांची देशभर सकारात्मक ख्याती आहे.अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ते तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आले आहे. मात्र २०१४ आणि २०१९ मधील निवडणूकीपेक्षा त्यांच्यासाठी यंदाची २०२४ ची निवडणूक अटीतटीची ठरली.निवडणूकीपूर्वी मी मत मागण्यासाठी पोस्टरही लावणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या गडकरींनी निवडणूकीत जोरदार प्रचार केला.

निवडणूक अटीतटीची होणार हे त्यांना कदाचित ठाऊक असल्यानेच त्यांनी एक अनोखा नवस बोलला होता. मी निवडणूक जिंकलो तर ‘ट्रकभर साखर’ देईल, असा हा नवस होता. अलिकडेच एका कार्यक्रमात त्यांनी या नवसाचा उलगडा केला.

हेही वाचा >>>ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…

कुठे केला होता नवस?

गडकरी यांनी त्यांच्या नवसाबाबत एका कार्यक्रमात माहिती दिली. गडकरी म्हणाले की मी सहसा अशा गोष्टी सांगत नाही पण आज सांगत आहे. विदर्भाच्या पर्यटनाबाबत एका कार्यक्रमात त्यांनी शेगावच्या संस्थानामधील व्यवस्थेचे पोट भरून कौतुक केले. शेगावचे संस्थान देशभरातील मंदिरांसाठी आदर्श आहे. निवडणुकीपूर्वी संस्थानाला एक ट्रक साखर देण्याचा नवस बोललो होतो. निव़डणूक जिंकल्यानंतर शेगावला साखरेचा ट्रक पाठवत असल्याचे सांगितले. पण शेगाव संस्थानच्या व्यवस्थापन मंडळाने आता आम्हाला साखरेची गरज नाही. आम्हाला गरज राहील तेव्हा सांगू, मग तुम्ही पाठवा, असे उत्तर दिले. संस्थानच्या व्यवस्थापनाने यासाठी ग़डकरींना रीतसर तारीखही दिली. मंदिर व्यवस्थापनाच्या कार्याचे कौतुक करताना गडकरींनी हे उदाहरण सांगितले आणि नकळतपणे आपल्या नवसाचीही माहिती दिली.  उल्लेखनीय आहे की गडकरी यांनी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचा पराभव केला होता.

हेही वाचा >>>“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

लाखोचे निर्णय घेतो,पण…

मी माझ्या मंत्रालयात लाखोंचे निर्णय घेतो. पण मला प्रचाराची आवड नसल्याने मी ते मिडीयाला सांगत नाही. राजकारणात म्हटले जाते की तुम्ही एक काम करा आणि दहादा सांगा, पण मी दहा काम करतो आणि एकच सांगतो, असे गडकरी म्हणाले. पुरातत्व विभाग विकास कार्यांमध्ये सर्वाधिक अपराधी आहे. गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिराचा विकास करण्यासाठी दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे, मात्र पुरातत्व विभागामुळे ते शक्य झाले नाही, अशी खंतही गडकरींनी व्यक्त केली. मी पर्यावरणवादी आहे, मात्र आपल्याला जमिनी स्तरावरील समस्याही समजून घ्यावा लागतील,असेही ते म्हणाले.