नागपूर : लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरहून निवडणूक रिंगणात उतरले आहे. दहा वर्षात आपण नागपूरचा इतका विकास केला की आपल्याला प्रचाराची, पोस्टर लावण्याची गरज भासणार नाही, असे गडकरी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी म्हणाले होते, निवडणूक जाहीर होताच त्यांची भाषा थोडी बदलली आहे, असे त्यांच्या शनिवारी झालेल्या भाषणातून दिसून येते.
२०१९ मध्ये गडकरी दोन लाखांहून अधिक मताधिक्याने नागपूर मधून दुसऱ्यांदा विजयी झाले होते. सर्वाधिक मते त्यांना पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते. या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तेथे वाठोडा येथील हॅरिसन लॉनमध्ये आयोजित भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकारी संमेलनात गडकरी यांनी संबोधित केले.
हेही वाचा >>>दानपेटीत टाकली पेटती अगरबत्ती, देणगीची रक्कम स्वाहा; कुठे घडला हा प्रकार? वाचा
गडकरी म्हणाले, ‘’ यावेळी मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आपल्याला विरोधकांना मिळणारी मते कमी करायची आहेत आणि ती भाजपला जोडायची आहेत. प्रभागानुसार मिळालेल्या मतांचा अभ्यास करावा लागेल. पूर्व नागपुरातून यापूर्वीच्या निवडणुकीत सर्वांत मोठी आघाडी होती. यंदा त्याहीपेक्षा जास्त मोठी आघाडी मिळेल असा विश्वास आहे,’ मी लोकांना प्रत्यक्ष येऊन भेटणार आहे. त्याच माध्यमातून लोकांशी संपर्क साधून आशीर्वाद घेणार आहे. पूर्व नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत येथील नागरिकांवरही पूर्ण विश्वास आहे,
हेही वाचा >>>आता पोलिसांकडून सराफा व्यावसायिकांचा छळ थांबणार! शासनाने घेताना ‘हा’निर्णय
मी लहानपणी या भागातून फिरलो आहे. त्यावेळी रस्त्यांची अवस्था वाईट होती. आज अतिशय उत्तम रस्ते झाले आहेत. या भागात सिम्बॉयसिससारखी संस्था आली. पिण्याचे पाणी सर्व वस्त्यांमध्ये पोहोचले आहे. आता तर आणखी ८९ जलकुंभ संपूर्ण नागपुरात होत आहेत. त्याचा फायदा गोरगरीब जनतेलाच होणार आहे,’ असेही गडकरी म्हणाले.
कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, बाल्या बोरकर, प्रमोद पेंडके, देवेंद्र दस्तुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.