वर्धा : मान्यवर जेव्हा एखाद्या कार्याची पाहणी करण्यास जातात, तेव्हा ते कार्य नेमके कसे चालते ते स्वतः तपासण्याचा मोह त्यांना पडतोच. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तर प्रत्येक बाब स्वतः हाताळून पाहण्याचे नेहमीच आवडते, असे सांगितल्या जाते.
एका दौऱ्यात ते यवतमाळ रस्त्यावरील देवळी तालुक्यात खासदार रामदास तडस यांच्या आग्रहास्तव थांबले. निमित्त होते ते इसापूर येथील रिजनल ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरला भेट देण्याचे. देश पातळीवर स्थापन झालेल्या काही केंद्रांपैकी हे एक आहे. यात जड व लहान वाहनांच्या चालकांना योग्य ते नियम पाळून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. इथले प्रशिक्षक खरेच तरबेज आहेत का, अशी विचारणा त्यांनी खासदारांना केली.
हेही वाचा – चंद्रपूर : हल्लेखोर बिबट व दोन बछडे पिंजराबंद
चला तर मग एकदा बघूनच घेवू या, असे म्हणत सगळे मोठ्या वाहनात बसले. अनुभवी चालकाच्या हाती स्टिअरिंग आले. आणि गडकरी यांनीच पुरस्कृत केलेल्या गुळगुळीत रस्त्यावर गाडी धावू लागली. केंद्राबाबत गप्पा रंगल्या. ते म्हणाले, रामदासजी तुमच्या नेतृत्वात सर्व प्रशिक्षण केंद्र चालकांना एकत्रित करा. संघटना बांधा. तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो. असे आश्वासन देत गडकरी यांच्यातील ‘आरटीओ’ जागा झाला. त्यांनी प्रशिक्षक चालकास काही जुजबी प्रश्नही विचारून टाकल्याचे समजले.
हेही वाचा – १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदांची भरती? कृती आराखडा तयार
गडकरी यांच्या सोबत खासदार तसेच कांचन गडकरी, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, सावंगी रुग्णालयाचे डॉ. उदय मेघे, आमदार अशोक उईके, राजू बकाने, पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अन्य या फेरफटक्यात सहभागी झाले होते.