नागपूर : आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गँरटी नाही, मात्र रामदास आठवले यांना आमचे सरकार येऊन मंत्री होण्याची गॅंरटी आहे, असे सांगत सरकार कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रीपद पक्के आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुरस्कार कार्यक्रमात व्यक्त केले.

मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या बॅनियन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, रामदास आठवले यांनी मनोगतामध्ये आतापर्यंत तीनवेळा मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा आमचे सरकार आल्यावर मंत्री होणारच असल्याचे वक्तव्य केले. त्यावर गडकरी म्हणाले, रामदास आठवले यांनी दलित पॅंथर संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघर्ष केला.

हे ही वाचा…नागपूर :पुरासाठी पुतळा कारणीभूत ठरला का ? एक वर्षांनंतरही प्रश्न अनुत्तरित

त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमांतून त्यांनी महाराष्ट्रात रिपब्लकिन चळवळ शक्तीशाली बनविण्याचे काम केले. केंद्रात यापूर्वी ते मंत्री होते आणि आता तिसऱ्यांदा ते मंत्री आहे. आता पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचे सरकार येऊन त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे, मात्र आम्हाला मात्र नाही आहे. गंमतीने मी नेहमीच म्हणत असतो राज्य कोणाचे आले तरी रामदास आठवले यांचे स्थान पक्के आहे असेही गडकरी म्हणाले. गेल्या मंत्रीमंडळात आठवले केंद्रात मंत्री असताना त्यावेळी लालूप्रसाद यादव रामविलास पासवान यांना म्हणाले होते, की रामदास आठवले हे राजकीय मौसमी शास्त्रज्ञ आहे. राजकारणात पुढे काय होणार आहे याची सर्व माहिती आठवले असते, असा किस्सा त्यांनी सांगितला.

हे ही वाचा…नागपूर : “एक नेता, एक निवडणूक म्हणजे राष्ट्रहित नव्हे,” साहित्यिक-समीक्षकांचे मत

आठवले यांनी दलित समाजासाठी काम करतांना दलित शोषित समाजाला न्याय देण्याचे काम केले असून दलित चळवळीचे रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील स्मारक, मुंबईच्या इंदू मिलच्या जागेत साकार होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या प्रकल्पांसाठी रामदास आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे सामाजिक आणि राजनीती कार्य हे मोठे आहे, असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले. सामाजिक ,राजकीय, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे काम गिरीश गांधी करत असल्याचे देखील गडकरी यांनी अधोरेखित केले.