नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी जाहीर केलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यसमितीत नागपूरचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांचा समावेश नसल्याने आश्चर्य वर्तवले जात आहे. विशेष म्हणजे राऊत हे खरगे यांचे निकटवर्तीय मानले जातात. खरगे यांनी कार्यसमितीत ३९ नेत्यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. प्रणीती शिंदे, अविनाश पांडे, चंद्रकांत हंडोरे, यशोमती ठाकूर, माजी मंत्री माणिकराव ठाकरे रजनी पाटील यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. यात पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांचा समावेश नाही.
हेही वाचा >>> सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वर्धा दौऱ्यात कमालीची गोपनीयता…
महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी सर्वप्रमथ ज्या तीन मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यात काँग्रेसकडून राऊत होते. खरगे यांनी यासाठी त्यांचे राजकीय वजन खर्ची घातल्याची त्यावेळी चर्चा होती. राऊत पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे प्रमुखही होते. ते सध्या विद्यमान आमदार आहेत. पक्षात वरिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा काँग्रेस कार्यसमितीत समावेश अपेक्षित होता. नागपूरमधील काँग्रेसच्या गटबाजीची जेव्हा चर्चा होते तेव्हा राऊत यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येते. ते पक्षाच्या अनेक कार्यक्रमात सहभागी होत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चाही वेळोवेळी होते. नागपूरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते गैरहजर होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नुकतीच नागपुरात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली होती. त्यातही राऊत सहभागी झाले नव्हते. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते हे विदर्भातीलच आहेत. या शिवाय मुकुल वासनिक, अविनाश पांडे, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांना समितीत घेण्यात आले आहे. त्यामुळे राऊत यांना पक्षात वेगळी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.