नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने डॉ. चौधरी यांच्यावर ठपका ठेवला आहे. परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची (एमकेसीएल) निवड आणि विनानिविदा बांधकामाचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. राज्य शासनाला हा अहवाल सप्टेंबर २०२२ मध्ये सादर करण्यात आला, परंतु अद्याप उच्च शिक्षण मंत्र्यांकडून कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘एमकेसीएल’सोबत विद्यापीठाने केलेला करार २०१५ मध्ये रद्द करण्यात आला होता. सप्टेंबर २०१७ मध्ये राज्य शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून ‘एमकेसीएल’ला कोणतेही काम थेट देऊ नये, असे बजावले होते. परंतु, विद्यापीठाने दोन्ही सूचनांचे पालन न करता ‘एमकेसीएल’ला कंत्राट दिल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कुलगुरू डॉ. चौधरी यांच्या अट्टाहासामुळे ‘एमकेसीएल’कडे परीक्षेचे काम देण्यात आले होते. यावेळी सर्वच स्तरातून या निर्णयाला विरोध झाला होता. असे असतानाही कुलगुरूंनी ‘एमकेसीएल’ संपूर्ण जबाबदारी घेत असल्याची घोषणा एका अधिसभेमध्ये केली होती.
हेही वाचा – सरकारी लालफितशाहीचा खुद्द गडकरींनाच फटका! संतापून केंद्राकडे केली तक्रार
हेही वाचा – रेल्वेने पुण्याला जाताय.. मग हे वाचाच!
आता बाविस्कर यांच्या समितीने ‘एमकेसीएल’च्या कंत्राट प्रकरणावर ठपका ठेवल्याने कुलगुरूंवर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कुलगुरू डॉ. चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी फोन आणि संदेशालाही प्रतिसाद दिला नाही