नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर सरकारने स्वतःहून गुन्हा नोंदविला पाहिजे, परंतु राज्य सरकार कारवाई करणार असे सांगते, पण ती कारवाई होताना दिसत नाही, असे काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्या निमित्त नागपुरात आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यानंतर त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य घराघरात पोहोचवण्यासाठी ‘छावा’ चित्रपटाला माहिती देणारे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना नागपुरातील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यानेच फोनवरून धमकी दिली. एवढेच नव्हेतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याविरोधात जनमानासात रोष निर्माण झाला. कोरटकर विरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु सरकारने त्याला अटक करण्यात चालढकल केली आहे. जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत, त्या कायद्या अंतर्गत कारवाई करता येते, नवीन कायद्याची गरज नाही, सरकारने स्वत:हून गुन्हा दाखल करून त्याला अटक करायला हवी होती, असेही शाहू महाराज म्हणाले.

ते म्हणाले, प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होती. कोरटकर दुसऱ्या राज्यात पळून गेल्याचे वृत्त वाचले. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्यास जामीन मिळाला असेल तरीपण ११ तारखेपर्यंत वेळ दिला आहे. ज्या प्रकराचे वक्तव्य केले. ते निषेधार्य आहे. ते कोणालाही ते वक्तव्य आवडलेले नाही. त्यांनी काय म्हटले आहे ते प्रसार माध्यमात आले आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली, असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर शेअर केली आहे. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले असे या ध्वनिफीत मधून दिसून येते.

Story img Loader