नागपूर : वर्धा मार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कारागृह आहे. तेथील पाच एकर जागा महामेट्रोने रेल्वे मार्गिकेसाठी घेतली. त्या बदल्यात कारागृहात काही सुविधा, बांधकाम करून देण्याचे आश्वासन महामेट्रोने दिले होते. पण ते पाळण्यात आले नाही. बर्डी ते खापरी या मार्गिकेसाठी महामेट्रोने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील पाच एकर जागेची मागणी केली होती. या जागेची किंमत ९९ कोटी रूपये आहे. या जागेच्या मोबदल्यात महामेट्रोला कारागृहात कैद्यांसाठी सोयी सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, शेताला कुंपण, सिमेंट रस्ते आणि अन्य काही विकास कामे करून द्यायची होती. पाच वर्ष उलटून गेली. पण रस्त्याच्या बाजूला भिंती यापलीकडे महामेट्रोने काही केले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : धुळ्याजवळील अवैध बायोडिझेल पंपावर विशेष पथकाचा छापा; १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

याबाबत मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने १७ ऑगस्टला महामेट्रोला पत्र पाठवून त्यांना विकास कामे केव्हा करणार याबाबत विचारणा केली. यापूर्वीही कारागृह प्रशासनाने महामेट्रोला अनेक स्मरण पत्रे पाठवली, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे कारागृहाकडे असलेली मोक्याची जागा गेली आणि त्यांच्या हातीही काही आले नाही. नागपूर मेट्रो हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रोजेक्ट आहे. कारागृह प्रशासन राज्य शासनाच्या गृहखात्याच्या अखत्यारित आहे. त्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No development of nagpur central jail from mahametro after 5 acres land acquisition cwb 76 css