१० हजार युवकांना रोजगाराचे आश्वासन हवेतच

मिहानमध्ये स्वस्त दरात जमीन देण्यात आल्याच्या आरोपामुळे बाजारात उत्पादन येण्यापूर्वीच चर्चेत आलेल्या रामदेव बाबा यांच्या ‘फूड व हर्बल पार्क’ला अद्याप उत्पादनाचा मुहूर्तच सापडला नाही. पतंजलीने आधी २०१८चे जुलै  मग मार्च व नंतर डिसेंबर अशी ‘तारीख पे तारीख’ दिली, परंतु अद्याप प्रत्यक्ष उत्पादनाचा दिवस उगवलेला नाही. परिणामी, या कारखान्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ होईल तसेच १० हजार युवकांना थेट रोजगार मिळेल, असे जे सांगण्यात आले होते ते सध्या तरी ‘जुमला’च वाटत आहे.

रामदेव बाबा यांच्या पंतजली समूहाला मिहानमध्ये  २५ लाख रुपये प्रति एकर जमीन देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी २३० एकर जमीन मिळाली. त्यावेळी या भागातील इतर उद्योजकांना ६० लाख ते १ कोटी रुपये दर आकारले जात असताना पंतजली समूहाला इतकी सवलत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे भूमिपूजनापूर्वीच हा प्रस्तावित प्रकल्प खूप गाजला होता.  उद्घाटनाच्या दिवशी सहा महिन्यात प्रकल्प सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे विदर्भातील युवकांच्या अपेक्षा उंचावल्या. निविदेतील अटीनुसार जमीन मिळाल्यानंतर एक वर्षांत उत्पादन सुरू करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, अजूनतरी उत्पादन सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे निविदेतील अटी आणि शर्ती न पाळल्यामुळे एमआयडीसीने कंपनीविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित आहे, परंतु याप्रकरणी नेमकी काय कारवाई झाली, ते अद्याप कळू शकले नाही.

या प्रकल्पाला भेट दिले असता, यंत्र बसवण्यात येत असल्याचे दिसून आले. तसेच काही गोदामे उभारण्यात येत आहेत. यासंदर्भात पतंजली समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये संत्र्याच्या रसाचे उत्पादन बाजारात येईल. मोठा प्रकल्प असल्याने विलंब झाला आहे. स्वित्र्झलडमधून अत्याधुनिक यंत्रे आणण्यात आली आहेत. दिवसाला ८०० टन संत्र्याचे रस काढले जाण्याची क्षमता या प्रकल्पाची आहे. सर्वप्रथम संत्र्याच्या रसाचे उत्पादन सुरू होईल, त्यानंतर आवळा, आंबे यांच्यावर प्रक्रिया केली जाईल. पतंजलीच्या धोरणानुसार फळाचा एकही भाग वाया जाणार नाही. संत्र्याच्या टरफलापासून तेल काढण्यात येईल. या प्रकल्पाचा मूळ उद्देश संत्र्यावर प्रक्रिया करण्याचा आहे. शेतकऱ्यांकडून थेट संत्री घेतली जाणार आहे. आंबे आणि आवळा विदर्भात पुरेसा न मिळाल्यास बाहेरून आणण्यात येईल. येथील कारखान्याची क्षमता ६०० टन प्रतिदिन आवळा आणि ४०० टन प्रतिदिन आंबा आणि इतर फळे अशी प्रक्रिया क्षमता राहणार आहे.