नागपूर : शहरात अद्याप एकही उष्माघातग्रस्ताची नोंद नाही. परंतु, तीन संशयितांचे मृत्यू महापालिकेने नोंदवल्याने येथे एकतर उष्माघाताचे रुग्ण जास्त आहेत किंवा मृत्यू चुकीचे नोंदवले. त्यापैकी खरे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात सातत्याने तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सियस आहे. डॉक्टरांकडे गॅस्ट्रो, अतिसार यासह उन्हामुळे होणाऱ्या विविध आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
रुग्ण वाढत असतानाही अद्याप शहरात एकही उष्माघाताचा रुग्ण नोंदवला गेला नाही. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची डॉक्टरांकडून लपवा-छपवी सुरू आहे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामीणमध्ये मात्र उष्माघाताचे ५ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. शहरात एकही रुग्ण नोंदवला नसला तरी १९ मेपर्यंत उष्माघाताच्या तीन संशयित मृत्यूची नोंद मात्र झाली आहे. त्यापैकी २ अनोळखी रुग्ण असून एका रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला मिळाली आहे. हे प्रकरण मृत्यू विश्लेषण समितीकडे वर्ग होणार असून, त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. इतर दोन रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याचे सांगत तीन संशयितांचे मृत्यू नोंदवल्याचे कबूल केले.