महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : राज्यात १८ वर्षांहून कमी वयाचा मुलगा वा मुलगी ५० ‘सीसी’हून जास्त क्षमतेचे वाहन चालवताना आढळल्यास त्यांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा कोणताही परवाना न देण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. परंतु परिवहन खात्याचे संकेतस्थळ व ॲपवर अशा कारवाईची सुविधाच नाही.
केंद्राच्या सूचनेवरून राज्याच्या परिवहन खात्याने राज्यात हेल्मेट न घालणाऱ्या व परवानाविना वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
१८ वर्षांखालील कुणी ५० सीसीहून जास्त क्षमतेचे वाहन चालवताना पकडल्यास त्याला २५ हजार रुपयापर्यंत दंड व २५ वर्षांपर्यंत कोणताही वाहन चालवण्याचा परवाना दिला जाऊ नये, अशी सूचना केली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील सुधारणेनुसार ही कारवाई होणार आहे. परंतु, संबंधित संकेतस्थळ व ॲपवर अशा कारवाईची सुविधाच नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांचे परवाने २५ वर्षापर्यंत कसे रोखणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आणखी वाचा-नागपूर : ५० रुपयांच्या नादात गमावले ३ लाख; सायबर गुन्हेगाराने दुकानदाराला गंडविले
अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
या विषयावर विचारणा करण्यासाठी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनी बंद होता. अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी प्रतिसाद दिला नाही. उप परिवहन आयुक्त (संगणक) संदेश चव्हाण यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.