महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: राज्यात रविवारी (३ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता विजेच्या मागणीत शनिवारच्या तुलनेत किंचित वाढ झाली. पण मागणीनुसार विजेची उपलब्धता झाल्याने महावितरणने भारनियमन केले नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.
राज्यात रविवारी दुपारी १२ वाजता महावितरणची एकूण विजेची मागणी २३ हजार ८४९ मेगावॉट होती. त्यानुसार वीज उपलब्ध झाल्याने राज्यात कुठेही भारनियमन झाले नाही. त्यामुळे राज्यात ३० तासापासून कुठेही भारनियमन झाले नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.
आणखी वाचा-साडेतीनशे बसने लाभार्थी कार्यक्रमाच्या दारी, पोलीस संरक्षणात बुलढाण्यात दाखल; प्रवासी सेवेवर परिणाम
राज्यात शुक्रवारी (१ सप्टेंबर) सकाळी ६ वाजताच्या दरम्यान महावितरणची विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॉट होती. त्यामुळे उपलब्ध विजेच्या तुलनेत मागणीत ९०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने सकाळी ६ ते ७.३० वाजेदरम्यान जी १ ते जी ३ गटातील फिडरवर आपत्कालीन भारनियमन केले गेले. तर शनिवारी (२ सप्टेंबर) महावितरणची शिखर मागणी सकाळी ५.४० वाजेदरम्यान दरम्यान २३ हजार ७०० मेगावॉटवर खाली आली. त्यामुळे उपलब्ध विजेच्या तुलनेत मागणीत १ हजार २०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यात सकाळी ५.४० ते ७.१५ दरम्यान जी गटातील फिडरवर भारनियमन करावे लागले.