चंद्रपूर : मुख्यमंत्रीपासून तर अर्थमंत्री अशी मोठ मोठी मंत्रिपदे देणाऱ्या या जिल्ह्याला पंधरा वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपद मिळालेले नाही. तसेच आता प्रथमच या जिल्ह्याला बाहेरील व्यक्ती पालकमंत्री म्हणून मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या जिल्ह्याने मा.सा. कन्नमवार यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिलेला आहे. कन्नमवार यांची कारकीर्द अनेक अर्थाने गाजली होती. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री कन्नमवार प्रतिनिधित्व करित असलेल्या सावली- मूल मतदारसंघातून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या फडणवीस मंत्री होत्या. सावली – मूल मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर बल्लारपूर हा नवीन मतदारसंघ तयार झाला. बल्लारपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मागील वीस वर्षांपासून आमदार सुधीर मुनगंटीवार करत आहेत. राज्याचा मुख्यमंत्री देणाऱ्या या मतदारसंघाला देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना स्थान मिळाले नाही. विशेष म्हणजे पंधरा वर्षांनंतर या जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही.

हेही वाचा – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन

राज्यात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात १९९५ मध्ये भाजप – शिवसेना युतीच्या सरकारमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री झाले. १९९९ ते २००८ पर्यंत जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाही. २००९ मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार राज्यमंत्री झाले. २०१० मध्ये संजय देवतळे कॅबिनेट मंत्री झाले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार अर्थ व वन मंत्री झाले. २०१९ मध्ये सत्ता परिवर्तण झाले तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाले. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये पुन्हा सुधीर मुनगंटीवार वन व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री झाले. मात्र २०२४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्री म्हणून स्थान दिले गेले नाही. दरम्यान आता बाहेरचा पालकमंत्री जिल्ह्याला मिळणार आहे.

१९९५ मध्ये शोभा फडणवीस पालकमंत्री होत्या. १९९९ ते २००९ या काळात बाहेरचा व्यक्ती पालकमंत्री होता. २०१० ते २०१४ संजय देवतळे व २०१४ ते २०१९ सुधीर मुनगंटीवार. २०१९ ते २०२२ विजय वडेट्टीवार व २०२२ ते २०२४ सुधीर मुनगंटीवार पालकमंंत्री होते. आता पुन्हा एकदा बाहेरील व्यक्तीकडे पालकमंत्रिपद जाणार आहे.

हेही वाचा – यंदा आमरस जोरात, दरही कमी होणार; कडाक्याच्या थंडीमुळे आंबेमोहोर…

राज्याला चंद्रपूर जिल्ह्याने मा.सा. कन्नमवार यांच्या रुपाने मुख्यमंत्री दिला. त्यानंतर याच जिल्ह्यातील मूल येथील मूळ रहिवासी असलेले देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. कन्नमवारनंतर या जिल्ह्याने फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्री दिला अशीही चर्चा आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No minister post to chandrapur devendra fadnavis cabinet sudhir mungantiwar no place rsj 74 ssb