आता आपले सरकार आले आहे, आता सारे कसे खुले खुले वाटत आहे. दहीहंडीचा उत्सव जोरात साजरा झाला, गणेशोत्सवदेखील धडाक्यात साजरा होणार, उत्सव साजरे करण्यासाठी आता कुठलीही आडकाठी नाही. हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून आता कुणाला तुरूंगातही टाकले जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या दहीहंडी उत्सवात टोलेबाजी केली आणि अप्रत्यक्षरीत्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
हेही वाचा – बुलढाण्याचा आगामी खासदार भाजपचाच! ; भाजप प्रदेशाध्यक्षांनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने येथील नवाथे चौकात आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले, काही महिन्यांआधी महाराष्ट्रात हनुमंताचा जयजयकार करणे पाप समजले जात होते. अशा कठीण समयी राणा दाम्पत्य मैदानात उतरले. हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून त्यांना १४ दिवस तुरूंगात रहावे लागले. अशा लढाऊ बाणा बाळगणा-या नवनीत राणा आणि रवी राणा यांचा आम्हाला अभिमान आहे. आता हनुमान चालिसा म्हटल्याने कुणाला तुरूंगाता टाकले जाणार नाही, कारण आपले सरकार आले आहे. आता सर्व उत्सव जोरात साजरे होणार आहेत.
विदर्भाला आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. अमरावती जिल्हा, विदर्भ विकासाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. ही दहीहंडी विकासाची दहीहंडी आहे. या हंडीतील विकासाची मलाई ही आपल्या सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याला आपल्या सर्वांची साथ हवी आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा – यवतमाळ : …अन् कृषिमंत्र्यांनी शेताच्या बांधावर घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद
देवेंद्र फडणवीस हे तर श्रीकृष्ण – बावनकुळे
राज्यातील महाविकास आघाडीचे दुष्ट सरकार घालविण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून सुशासन आणणारे देवेंद्र फडणवीस म्हणजे आजच्या काळातले श्रीकृष्ण आहेत, असा गौरवोल्लेख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केला. बावनकुळे म्हणाले, ज्या प्रमाणे कौरवांना पराभूत करण्यासाठी महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करून पांडवांची साथ दिली, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या दुष्ट सरकारविरोधातील युद्ध जिंकण्यासाठी परिश्रम घेतले. पन्नास दिवसांत ५८ शासन निर्णय घेतले. ओबीसी आरक्षण मिळवून देण्याचा निर्णय, दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय, असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.