नातेवाईक नसलेले आणि वृद्धाश्रमाचे शुल्क देण्यास तयार असूनही दृष्टिहीनांसाठी एकही वृद्धाश्रम नागपुरातच काय पूर्ण विदर्भात नसल्याने त्यांची कमालीची गैससोय होत आहे.

घरी ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे ते पुणे किंवा गुजराथमध्ये जावून राहू शकतात. मात्र, ९९ टक्के अंधांच्या बाबतीत ते शक्य होत नाही. एकतर रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने किरकोळ व्यवसाय करतात. रेल्वे किंवा बस स्थानकावर वस्तू विकून गुजराण करतात. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या किंवा शासकीय कार्यालयांमध्ये तर पूर्णत: अंधत्व लाभलेल्यांना काही थाराच नाही. मात्र, जी मंडळी यापूर्वी नोकरीला लागली आणि सेवानिवृत्त झाली त्यांचे समाजात हाल आहेत. लग्न न झाल्याने कुटुंब नाहीच शिवाय वृद्धाश्रमही त्यांना आश्रय द्यायला तयार नाही. त्यामुळे फार हलाखीचे जीवन त्यांना जगावे लागत आहे. अन्ना पात्रटकर आणि नारायण कन्हेरे ही जोडगोळी मंदिरात एखादे भजन करून कसेबसे जीवन जगत आहेत. भीमराव वाडी बीडीपेठ भागात राहतात. केनिंगचे काम करायचे. वृद्धाश्रमाची चौकशी केली मात्र, सोय कुठेच न झाल्याने खोली करून राहतात.

‘‘वृद्धाश्रमाऐवजी दृष्टीहीनांचे खरोखर हाल आहेत. ज्यांचे कुणीच नाही आणि वयोमानाने ते काही करू शकत नाहीत त्यांनी कुठे जायचे? नागपुरात अशाप्रकारचे वृद्धाश्रम उभारण्याचे आम्ही ठरवले होते. पण, त्यापूर्वी पत्नी राधा बोर्डे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे भविष्यकालीन योजना बारगळली. मात्र, नागपुरात अपंगांसाठी वृद्धाश्रमाची फार गरज आहे. कारण प्रत्येकजण पुण्याला जावून खर्च करू शकत नाही. त्यामुळे खोली घेऊन जमेल तसे काम करून ही मंडळी जगत आहेत. ’’

– पुंडलिक बोर्डे, अध्यक्ष, लुई-राम वाचनालय

‘‘मी एकदोन नव्हे तब्बल सहा-सात सामान्यांच्या वृद्धाश्रमांना भेट दिली. पण, निराशाच पदरी पडली. कारण कोणीही मला ठेवून घ्यायला तयार नाही. तुमचे कोण करणार, तुम्ही कसे येणार,  कसे जाणार, रोजचे व्यवहार कसे करणार? कपडे कसे धुणार? असे नानाविध प्रश्न विचारून टाळाटाळ केली जाते. वृद्धाश्रमाचे शुल्क भरायला तयार असूनही हे हाल आहेत. ’’

-प्रकाश उत्तरवार, सेवानिवृत्त, आयुधनिर्माणी, नागपूर</strong>

‘‘अंध-अपंगांसाठी कार्यक्रम करणे किंवा एखादे काम उभे करणे फार कठीण असते. कारण अपंगांकडून दानदात्यांना फार काही मिळत नाही. प्रसिद्धी मिळत असेल तर थोडीफार मदत करायला तयार असतात. माझ्याकडे अनेक लोक वृद्धाश्रमाची चौकशी करायला येतात. मात्र विदर्भातच ते नसल्याने फार निराश होतात. अशाप्रकारे केवळ अंधांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. पण, त्यासाठी वेळ लागेल. ’

-रेवाराम टेंभुर्णीकर, सरचिटणीस, विदर्भ, राष्ट्रीय दृष्टिहीन संघ