मच्छीमार कल्याणकारी संघटनेचा आरोप; निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

अविष्कार देशमुख, नागपूर</strong>

सत्ता आल्यास मासोळी बाजारासाठी जागा देऊ, असे आश्वासन देऊन गडकरी यांनी मागील लोकसभा निवडणूक जिंकली. पक्षाची राज्यातही सत्ता आली मात्र अद्याप जागा मिळाली नाही, त्यामुळे नाराज झालेल्या मच्छीमार कल्याणकारी संघटनेने आगामी  निवडणुकीत भाजपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य भारतातील सर्वात मोठा मासोळी बाजार शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयापुढे (मेयो) भरतो. या बाजाराला पन्नास वर्षांची परंपरा आहे. येथे  मासोळी व्यावसायिकांची दुसरी पिढी अनेक अडचणींचा सामना करत व्यवसाय करीत आहे. अगदी छोटय़ाशा गल्लीत थाटलेल्या मासोळी बाजारात दररोज एक कोटीची उलाढाल होते. अरबी समुद्रात आढळणारे मासे येथे मिळतात.  सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत भरणाऱ्या बाजाराला आता जागा अपुरी पडू लागली आहे. २००८ मध्ये  गडकरी मासोळी बाजारात आले असता  मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी त्यांना भेटले व बाजारातील अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. बाजारासाठी हक्काच्या जागेची मागणी केली. मात्र आम्ही सत्तेत नाही त्यामुळे लगेच जागा देणे कठीण आहे, असे गडकरींनी सांगून वेळ मारून नेली. कालांतराने महापालिकेत

भाजपची सत्ता आली. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी परत गडकरी यांच्याकडे निवेदन घेऊन गेले. तत्कालीन महापौर माया इवनाते यांना गडकरींनी जागा देण्याचे सांगितले. अशात १३ नंबर नाका येथे मासोळी बाजारासाठी स्थायी समितीने मंजुरी दिली, असे संघटनेला सांगण्यात आले. मात्र जागा काही मिळाली नाही. दरम्यान, तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनाही अनेक निवेदने दिली. मात्र जागा मिळत नसल्याने त्यांच्या पालिकेतील दालनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मासोळ्या फेकून निधेष नोंदवला. मात्र उपयोग झाला नाही. २०१४ मध्ये निवडणुकांच्या पूर्वी संघटनेचे पदाधिकारी गडकरींना भेटले. तुम्ही आम्हाला निवडून द्या, तुमचा प्रश्न निकाली काढतो असे आश्वासन त्यांनी दिले.  २०१४ मध्ये देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. गडकरी मंत्री झाले. त्यामुळे संघटनेच्या आशा परत पल्लवित झाल्या. परत निवेदनांचा सिलसिला सुरू झाला. दरम्यान, साडेचार वर्षे लोटली. मात्र मासोळी बाजाराला जागा काही मिळाली नाही. आमदार सुधाकर कोहळे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, महापौर सर्वाना निवेदने दिलीत, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही.

संघटनेला नवे आश्वासन

आम्ही गडकरी यांची त्यांच्या रामनगर येथील निवासस्थानी भेट घेतली व त्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी  स्मार्ट सिटी अंतर्गत हायजेनिक मासोळी बाजार तयार करून देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे दुखावलेल्या संघटनेने आता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, असे  संघटनेचे अध्यक्ष सीताराम गौर यांनी सांगितले.

आम्हाला गेल्या दहा वर्षांपासून आश्वासनांवर आश्वासन मिळत आहे. त्यामुळे गडकरी साहेबांना विनंती केली की तुम्ही पारडी नाक्याजवळ  दोन एकर जागा द्या. त्यावर आम्ही पसा गोळा करून मासोळी बाजार बांधतो. मात्र हे कळताच आमदार कृष्णा खोपडे यांनी त्या जागेवर शाळा बांधण्याचा दावा केला.

– सीताराम गौर, अध्यक्ष मच्छीमार कल्याणकारी संघटना

Story img Loader