लोकसत्ता टीम
वर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने प्रत्येक राजकीय पक्ष विविध परीने तयारीस लागल्याचे चित्र आहे. रस्त्यावर लढून राजकारण करणारा पक्ष, असे संघटनेस महत्व नं देणारे काँग्रेस नेते कधी काळी म्हणत. मात्र आता भाजपच्या धर्तीवर काँग्रेस पण संघटनात्मक कार्यक्रम आखू लागला आहे. आता तर संवादात्मक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू होणार.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बूथ पातळीवर कसे नियोजन कसे असावे, यासाठी जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्याची सूचना झाली आहे. येणारी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख म्हणून नेमलेल्या कार्यकर्त्यांना अवश्य बोलवावे, अशी सूचना आहे. प्रशिक्षण एकतर्फी नसणार. संवादात्मक पद्धतीने होणार. हे प्रशिक्षण अ. भा. काँग्रेस समितीच्या प्रशिक्षण विभागाशी संबंधित संस्थेचे स्वयंसेवक देणार आहे.
आणखी वाचा-सर्व विमानतळांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
निवडणूक लढण्यास ईच्छुक, पक्षातील प्रमुख नेते हे प्रशिक्षणार्थिंची निवड करतील. दीड तास पक्षाची विचारधारा व निवडणूक प्रचाराचे मुद्दे तर दुसऱ्या दीड तासात बूथ बांधणी, बूथ समितीचे काम व सोशल मीडिया बळकट करणे यावर प्रशिक्षण होणार. सत्र सूरू झाल्यावर कुणालाच प्रवेश मिळणार नाही. महत्वाचे मार्गदर्शन असल्याने सेल्फी, फोटो, मोबाईल, वॉट्स अँप यास मनाई आहे. सत्रारंभी किंवा शेवटीच वापरता येईल. गांधीवादी पद्धतीने होणार असल्याने कोणीही लहान मोठा असणार नाही. पदाधिकाऱ्यांस कोणतेही विशेषधिकार मिळणार नाही. त्यांना आहे ते सर्व नियम पाळावे लागणार. सहभागी सर्व समान, हे सूत्र. शिबीर मोकळ्या जागेत नव्हे तर सभागृहातच व्हावे. साउंड सिस्टीम अत्यंत चांगली असावी. शिबिरात विविध पिपिटी, व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षक चमू शिबीर प्रमुखांस पत्रकाचा संच देणार.प्रशिक्षण शिबीर अत्यंत गांभीर्याने घेण्याचे निर्देश आहेत.
आणखी वाचा-२०० किमी फिरा… रस्त्यांतील खड्डे तपासा! ; सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंत्यांना निर्देश
शिबीर प्रशिक्षण घेणारी लोकायत ही संस्था गांधी पुरस्काराने सन्मानित असून काँग्रेसच्या अखिल भारतीय प्रशिक्षण समितीसोबत विविध शिबीरे आयोजित करीत असते. सक्रिय सदस्यांच्या आर्थिक सहभागातून चालणाऱ्या या संस्थेने राष्ट्रीय व राज्य शिबिराचे आयोजन पूर्वी केले आहे. ती मानधन घेत नाही. संविधानावर आधारित समाज निर्माण व्हावा, हे ध्येय ठेवून या संस्थेने शिबीर घेण्यास मान्यता दिली. त्यामुळे हे संपूर्ण शिबीर गंभीरतेने घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.