नागपूर: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाबाबतील शिक्षक परिषदेचे उमेदवार व या मतदारसंघातील विद्यमान आमदार नागो गाणार यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने गाणार यांना पाठींबा जाहीर केला आहे, मात्र त्यांच्यासोबत अर्ज भरताना भाजपचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे शिक्षक मतदारसंघात भाजपच लढणार अशी चर्चा होती, मात्र पक्षाने बुधवारी गाणार यांना पाठिंबा दिला. गाणार या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. त्यांची उमेदवारी शिक्षक परिषदेने आधीच जाहीर केली होती व भाजपने त्यांना पाठींबा जाहीर करावा, अशी विनंती केली होती.
हेही वाचा >>> नागपूर : भाजप समर्थित उमेदवार नागो गाणारांची थेट देवेंद्र फडणवीसांविरोधात भूमिका
मात्र भाजपने पाठिंबा जाहीर करायला ऊशीर लावल्याने गाणार यांना पाठिंबा देण्याबाबत भाजपमध्ये ऐकमत नसल्याची चर्चा होती. अखेर भाजपने पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज गाणार यांनी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्यासोबत भाजपचा एकही बडा नेता नव्हता. विशेष म्हणजे अर्ज भरताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. आमदार मोहन मते, माजी आमदार अनिल सोले यांचा अपवाद सोडला तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. अमरावती पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरताना खुद्द फडणवीस उपस्थित होते हे येथे उल्लेखनीय. दरम्यान याबाबत गाणार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, , “सर्व लोक एकत्र आहेत आणि प्रत्येकजण त्याला दिलेली जबाबदारी पार पाडीत आहे.